महाराष्ट्र
Trending

Mumbai Election : मुंबईत मतदानावेळी गोंधळ! बोटावरची शाई पुसली गेल्याने खळबळ; ‘पाडू’ मशीन अन् माध्यम बंदीवरून निवडणूक आयोग आरोपांच्या पिंजऱ्यात

Mumbai Election News : मार्करच्या शाईवरून आयुक्तांची कबुली; राज ठाकरेंचा ‘पाडू’ मशीनवरून हल्लाबोल तर माध्यमांना रोखल्याने संशयाचे धुके गडद

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान सुरू झाले खरे, मात्र काही तासांतच मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईबाबत तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटाला लावलेली शाई (Marker Ink) चक्क पुसली जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे एकाच मतदाराने दोनदा मतदान केल्यास ते कसे ओळखणार? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

बोटावरची शाई की मार्करची गंमत?

यंदा निवडणूक आयोगाने बाटलीतील शाईऐवजी ‘मार्कर पेन’चा वापर केला आहे. मात्र, मुंबई आणि कोल्हापूरमधील अनेक केंद्रांवर मतदारांनी दावा केला की, बोटावर लावलेली ही खूण साध्या रुमालाने किंवा पाण्याने पुसली जात आहे. यावर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले की, “नखावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.” मात्र, ही शाई 2012 पासून वापरली जात असल्याचा बचाव आयोगाने केला आहे. तरीही, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी शाई पुसली जाणे हा ‘निवडणूक आयोगाचा मोठा ब्लंडर’ असल्याची टीका विरोधक करत आहेत.

काय आहे ते ‘पाडू’ (PADU) मशीन?

निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी PADU (Printing Auxiliary Display Unit) नावाचे एक नवीन यंत्र ईव्हीएमला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मशीनवरून राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

वापर: जर ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटचा डिस्प्ले बिघडला, तर हे मशीन बॅकअप म्हणून वापरले जाईल आणि थेट डेटा प्रिंट करेल.
राज ठाकरेंचा आक्षेप: “हे मशीन नक्की काय आहे, ते कोणालाच दाखवले का नाही? ऐन मतदानाच्या वेळीच हे नवे प्रयोग कशासाठी?” असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मुंबईतील केवळ 140 केंद्रांवरच हे मशीन का वापरले जात आहे, यावरूनही संशय व्यक्त केला जात आहे.

माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात ‘नो एन्ट्री’

आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच निवडणूक आयोगाने आणखी एक धक्कादायक फर्मान सोडले. मतदान केंद्राच्या आत माध्यम प्रतिनिधींना चित्रीकरण किंवा वार्तांकनासाठी मज्जाव करण्यात आला आहे. एरवी पारदर्शकतेचा दावा करणारा आयोग माध्यमांना रोखून नक्की काय लपवू पाहत आहे? असा संतप्त सवाल पत्रकार संघटना आणि राजकीय पक्षांनी विचारला आहे.
विरोधकांचा ‘पारदर्शकते’वर प्रहार
“एकीकडे शाई पुसली जातेय, दुसरीकडे ‘पाडू’ नावाचे अनाकलनीय मशीन लावले जातेय आणि तिसरीकडे माध्यमांना दूर ठेवले जात आहे. हे सर्व पाहता ही निवडणूक पारदर्शक आहे की सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी ‘मॅनेज’ केली आहे?” असा गंभीर आरोप शिवसेना (UBT) नेते संजय राऊत आणि काँग्रेसने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0