Mumbai Cyclothon : मुंबईत सायक्लॉथॉनच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधात बुलंद घोेषणा!

Mumbai Cyclothon for drug awareness : ‘Say No to Drugs’चा बुलंद नारा; 450 सायकलस्वारांचा उस्फूर्त सहभाग
मुंबई | 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन आणि अवैध तस्करी विरोधी दिनाचे औचित्य साधून बृहन्मुंबई पोलीस व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी “सायक्लॉथॉन” चे आयोजन करण्यात आले. Mumbai Cyclothon या उपक्रमाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, युवकांनी “Say Yes to Life, No to Drugs” या घोषवाक्याचा नारा देत शहरभर रॅली काढली.

बृहन्मुंबई पोलीस व एनसीबीच्या संयुक्त उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
सायक्लॉथॉन रविवारी 22 जून रोजी (सकाळी 7 वाजता) बांद्रा रेक्लेमेशन बस स्टॉप येथून सुरू झाली. लिलावती हॉस्पिटल, चॅपेल रोड, हिल रोड, सेंट पॉल रोड, कार्टर रोड, जुहू बीच आदी मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली. जवळपास 400 ते 450 सायकलस्वारांनी मोफत नोंदणी करून या उपक्रमात सहभाग घेतला. स्त्री-पुरुषांसह युवकांचा मोठा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त लखमी गौतम व निशीथ मिश्र, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलिस उप आयुक्त नवनाथ ढवळे यांनी या रॅलीच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.
सायक्लॉथॉनदरम्यान ‘Say No To Drugs’ अशा घोषणा देत तरुणांनी समाजातील अंमली पदार्थांच्या विळख्याविरोधात बळकट संदेश दिला. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनीही रस्त्यावर उभे राहून प्रोत्साहन दिले.



बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे 12 ते 26 जून दरम्यान ‘नशा मुक्त भारत पंधरवडा’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामध्ये शाळा-महाविद्यालयांत जनजागृती, नशा मुक्त केंद्रांतील व्यक्तींना मार्गदर्शन, पोस्टर्स-बॅनर्सद्वारे जनजागृती, पथनाट्य, कोपरा सभा अशा उपक्रमांचा समावेश आहे.


