Mumbai Crime News : रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणीचा मोबाईल हिसकावणारा अखेर सापडला!

•गोवंडीतील गुन्हेगाराला अंधेरी पोलिसांची सापळा यशस्वी; दुसरा आरोपी फरार
मुंबई, अंधेरी – वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील अंधेरी फ्लायओव्हरवर एक रोमांचक चकमकीसारखी घटना घडली. रात्रीच्या वेळी रिक्षात एकटी प्रवास करणाऱ्या तरुणीच्या हातातून 90 हजार रुपयांचा आयफोन 16 प्रो मोबाईल मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.त्यानंतर अवघ्या काही दिवसांत, अंधेरी पोलिसांनी सात दिवस सलग तपास राबवून या गुन्ह्यातील प्रमुख आरोपीला गोवंडीतील गुन्हेगारीच्या अड्ड्यातून अटक केली.
ही घटना 27 जून 2025 रोजी रात्री 10.40 वाजता घडली. फिर्यादी खुशबू संजय मिश्री (वय 28, रा. भाईंदर पश्चिम) या गोरेगावहून सांताक्रुझकडे रिक्षाने प्रवास करत होत्या. अंधेरी फ्लायओव्हरवर मोटरसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या हातातील आयफोन 16 प्रो (सोनेरी रंग) हा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला आणि काही क्षणांतच गायब झाले.
या घटनेनंतर 28 जून रोजी पहाटे 2.22 वाजता अंधेरी पोलीस ठाण्यात कलम 309(4), 3(5) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त (परिमंडळ 10) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (अंधेरी विभाग) शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंदर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.
तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक परकाळे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली. घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून एक काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल दिसून आली. याच धाग्यांवरून तपास पुढे सरकवताना पोलिसांना गोवंडीतील फैय्याज नसीम खान ऊर्फ सबलू (वय 24, रा. जे लाईन, शिवाजीनगर, गोवंडी) याच्यावर संशय आला.
सलग दोन दिवस रात्रीच्या वेळेस गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात सापळा रचून अखेर सबलूला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.दुसरा आरोपी अदनान कुरेशी (वय 24, रा. शिवाजीनगर, गोवंडी) अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
या धडाकेबाज कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक तेजस खंडागळे यांनी गुन्हा नोंदविला.पोलीस उपनिरीक्षक परकाळे,पोलीस हवालदार पेडणेकर, सूर्यवंशी, शिंदे,पोलीस शिपाई म्हात्रे, लोंढे, पाटील, मोरे,पो.ह. पिसाळ (तांत्रिक मदत) यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.सद्यस्थितीत अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून, दुसऱ्या फरार आरोपीचा शोध जोरात सुरू आहे.



