मुंबई

Mumbai Crime News : पोलीस भरतीला गालबोट! शारीरिक चाचणीपूर्वी इंजेक्शनद्वारे ‘ड्रग्ज’ घेणाऱ्या उमेदवाराला अटक

•मीरा-भाईंदर पोलीस पथकाची भरती मैदानात मोठी कारवाई; बारामतीचा उमेदवार जेरबंद, भरती प्रक्रियेतून बाद

भाईंदर :- पोलीस शिपाई भरती 2024-25 ची मैदानी चाचणी सध्या भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर सुरू आहे. मात्र, सोमवारी पहाटे या प्रक्रियेला गालबोट लागणारी घटना घडली. मैदानी चाचणीत अधिक जोमाने धावता यावे, यासाठी चक्क इंजेक्शनद्वारे शरीरात उत्तेजक द्रव्य सोडणाऱ्या साहिल शंकर अवघडे (23 वय) या उमेदवाराला अंमली पदार्थ तपासणी पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याची पोलीस भरतीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

तंबुच्या आडोशाला सुरू होता खेळ

सोमवारी (23 फेब्रुवारी) पहाटे 5 वाजता साधारण 2500 उमेदवारांना मैदानावर प्रवेश देण्यात येत होता. संपूर्ण शरीर तपासणी आणि बॅग तपासणीनंतर उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी सोडले जात होते. दरम्यान, अंमली पदार्थ तपासणी पथकाचे पोलीस साध्या वेशात मैदानावर गस्त घालत होते. यावेळी 100 मीटर धावण्याच्या ट्रॅकसमोर असलेल्या बिस्कीट आणि ग्लुकोजच्या तंबुच्या मागे आडोशाला साहिल अवघडे हा संशयास्पद हालचाली करताना आढळला.

साहिल हा एका हाताने दुसऱ्या हाताच्या दंडामध्ये इंजेक्शनच्या सहाय्याने उत्तेजक द्रव्य (Steroids/Stimulants) शरीरात टोचताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. आरोपी साहिल हा बारामती (जि. पुणे) येथील रहिवासी आहे.

कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल

अटक केलेल्या उमेदवाराची तात्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुशांत मुर्गे यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिलविरुद्ध औषधीद्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940 चे कलम 18 (क) (1) आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 व 62 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भरती मैदान सीसीटीव्ही आणि हॅन्डीकॅमच्या निगराणीत

पोलीस प्रशासनाने भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

संपूर्ण मैदान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहे.

व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी 69 हॅन्डीकॅम पथके तैनात आहेत.

अंमली पदार्थ तपासणीसाठी 20 पोलीस अंमलदारांचे विशेष पथक आणि दोन फिरती पथके तैनात आहेत.

मैदानावर डॉक्टरांचे स्वतंत्र पथकही कार्यरत आहे.

अपर पोलीस आयुक्तांचे आवाहन

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त यांनी सर्व उमेदवारांना कडक इशारा दिला आहे. “शारीरिक चाचणी दरम्यान कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नका. उत्तेजक द्रव्य किंवा अंमली पदार्थ सेवन करताना किंवा जवळ बाळगताना कोणी आढळल्यास त्याला तात्काळ भरती प्रक्रियेतून बाद करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago