Mumbai Crime News : 25 लाखांच्या बनावट नोटांसह एकजण अटक, काळाचौकी पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Fake Currency Latest News : रे रोड परिसरात सापळा रचून कारवाई; बनावट नोटा स्कॅनिंग एटीएममध्येही चालतील, असा आरोपींचा दावा
मुंबई, काळाचौकी – कॉटन ग्रीन परिसरात काळाचौकी पोलिसांनी केलेल्या सखोल कारवाईत तब्बल 25 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणात अंकित दीनानाथ पराशर (वय 31) याला अटक करण्यात आली असून, समा हुसेन लतीफ, कबीर आणि रंजीत बेहरा हे तिघे फरार आहेत. बनावट नोटा विक्रीचे हे जाळे शहरात पसरले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. Mumbai Latest Crime News
पोलीस तपासानुसार, कबीर व नवाब मोक्कार या दोघांनी एका तक्रारदाराशी संपर्क साधून 500 रुपयांच्या बनावट नोटा अत्यंत दर्जेदार असल्याचा दावा केला. त्या ATM व कॅश डिपॉझिट मशीनमध्येही सहज स्वीकारल्या जातील, असे सांगत त्यांनी ‘एक लाखात पाच लाख’ आमिष दाखवले.
तक्रारदाराला संशय आल्याने त्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक हसन मुलानी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी चार पथकांची स्थापना करून 28 जूनच्या मध्यरात्री रे रोड स्थानक परिसरात सापळा रचला. आरोपी अंकित पराशर भेटीच्या ठिकाणी पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे पाच गठ्ठे सापडले. विशेष म्हणजे प्रत्येक गठ्ठ्यातील फक्त वरच्या काही नोटा खऱ्या, तर उर्वरित सर्व बनावट असल्याचे उघड झाले. प्रारंभी तपासात या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारे अनेकांना गंडवले असल्याचा संशय आहे.
अंकित सध्या पोलिस कोठडीत असून, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. मुख्य सूत्रधारही पोलिसांच्या रडारवर असून, लवकरच मोठे नेटवर्क उघड होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


