मुंबई

1 May Celebration : 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा करता

•महाराष्ट्र दिनाचा काय इतिहास आहे

मुंबई :- 1950 च्या दशकात भाषावार राज्यांच्या निर्मितीसाठी आंदोलनं जोर धरू लागली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली. मात्र मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा की नाही, यावरून मोठा वाद निर्माण झाला.

दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस मराठी अस्मितेचा, शौर्याचा आणि एकतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी सांस्कृतिक, शासकीय तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

21 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबईच्या फ्लोरा फाउंटन परिसरात हजारो आंदोलकांनी एकत्र येत सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार निदर्शने केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज आणि नंतर गोळीबार केला.

या घटनेत 106 आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले. हे हुतात्मे आजही महाराष्ट्राच्या मनामनात जिवंत आहेत. त्यांच्या बलिदानामुळेच शेवटी केंद्र सरकारने नमते घेतलं आणि 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं.

150 वर्षांपासून ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेला आपला भारत देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतातील ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण राज्यांची निर्मिती होणे अद्याप बाकी होते. मग भाषा आणि प्रदेशानुसार राज्यांची निर्मितीला सुरुवात झाली. मद्रास राज्यातील तेलुगू भाषिक भागांमध्ये एक शक्तिशाली आंदोलन झाले. त्यानंतर 1953 मध्ये आंध्र राज्याच्या निर्मितीचा संपूर्ण देशभरात परिणाम झाला आणि राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती करण्यात आली. 1956 मध्ये संसदेने राज्य पुनर्रचना कायदा संमत केला; ज्यामुळे भारतीय राज्यांच्या सीमा पुन्हा रेखाटण्यात आल्या.

वास्तविक ‘राज्य पुनर्रचना कायदा’ 1956 अंतर्गत अनेक राज्ये निर्माण झाली. या कायद्याच्या आधारे कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांना म्हैसूर राज्य म्हणजेच कर्नाटक राज्य देण्यात आले. तेलुगू भाषेतील लोकांना आंध्र प्रदेश राज्य मिळाले. त्याच वेळी मल्याळम भाषेच्या लोकांना केरळ आणि तमीळ भाषेच्या लोकांना तमिळनाडू राज्य मिळाले. मराठी आणि गुजराती लोकांना स्वतःचे वेगळे राज्य मिळाले नाही. राज्य पुनर्रचना कायद्यान्वये मुंबई प्रांतासाठी नवीन सीमा तयार केल्या गेल्या होत्या. मुंबईच्या प्रांताच्या सीमा मराठवाडा, विदर्भ, सौराष्ट गुजारतपर्यंत विस्तारून नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली. ज्यामुळे द्विभाषिक लोकांचा मुंबई प्रांतात समावेश झाला. त्यात मराठीसह कच्छी व कोकणी भाषा बोलणाऱ्या लोकांचा समावेश होता. 1956 पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीद्वारे मराठी भाषकांनी स्वतंत्र राज्याच्या मागणी केली. दुसरीकडे गुजराती भाषेतील लोकांनाही स्वत:चे वेगळे राज्य हवे होते. त्यांनीही चळवळ सुरू केली. या आंदोलन व चळवळींचा परिणाम होऊन, 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्यांतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0