मुंबईठाणे
Trending

Ulhasnagar News :उल्हासनगर भाजपमध्ये ‘एबी फॉर्म’चा मोठा पेच! अधिकृत उमेदवारावर अपक्ष लढण्याची वेळ; पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

Ulhasnagar BJP News : पॅनल 19 मध्ये भाजपचा तांत्रिक गोंधळ; कोमल लहरानींना मिळाले ‘क्रिकेट फलंदाज’ चिन्ह, पक्षादेश मोडणाऱ्या कुरसेजांवर कारवाई

उल्हासनगर | उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पॅनल क्रमांक 19 मध्ये पक्षाने मर्यादेपेक्षा जास्त उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिल्याने तांत्रिक पेच निर्माण झाला. या गोंधळामुळे भाजपची मोठी नाचक्की झाली असून, पक्षाच्या अधिकृत उमेदवार कोमल दिनेश लहरानी यांना आता पक्षाच्या चिन्हाऐवजी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे.

नेमका काय आहे ‘एबी फॉर्म’चा घोळ?

पॅनल 19 मधील चार जागांसाठी निवडणूक होत असताना भाजपकडून चुकून पाच जणांना एबी फॉर्म देण्यात आले. विशेषतः ’19 ब’ या जागेसाठी कोमल दिनेश लहरानी आणि लक्ष्मी बंटी कुरसेजा या दोघींनीही भाजपचा बी-फॉर्म जोडल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली. जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या मते, लक्ष्मी कुरसेजा यांना तांत्रिक चुकीमुळे फॉर्म देण्यात आला होता. ही चूक लक्षात येताच त्यांना फॉर्म मागे घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यांनी पक्षादेश डावलून तो निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला.

चिन्हाचा पेच आणि भाजपची भूमिका

या गोंधळामुळे कोमल लहरानी यांना भाजपचे ‘कमळ’ हे अधिकृत चिन्ह मिळू शकले नाही. त्या आता ‘क्रिकेट फलंदाज’ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. जिल्हाध्यक्ष वधारिया यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक अडचण असली तरी कोमल लहरानी याच भाजपच्या अधिकृत पुरस्कृत उमेदवार आहेत आणि संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी उभा राहील.

पदाधिकाऱ्यांवर हकालपट्टीची गाज

पक्षनेतृत्वाचा आदेश न मानणाऱ्या लक्ष्मी बंटी कुरसेजा यांच्यावर भाजपने कडक कारवाई केली आहे. त्यांना त्यांच्या मंडळ अध्यक्ष पदावरून तात्काळ हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी सिंधू शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, लक्ष्मी कुरसेजा यांनी आपणच पक्षाच्या खऱ्या उमेदवार असल्याचा दावा केल्याने या प्रभागातील निवडणूक चुरशीची आणि वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0