Mumbai Crime News : मुंबई उडविण्याची धमकी देणारा २४ तासांत अटकेत – गुन्हेशाखेची धडाकेबाज कारवाई

मुंबई | ५ सप्टेंबर २०२५ :- मुंबई शहरात मानवी बॉम्बच्या माध्यमातून ४०० किलो आरडिएक्सचा वापर करून मोठा स्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या इसमाला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. गौतम बुध्द नगर पोलीसांच्या मदतीने उत्तर प्रदेशातील नोएडा येथे ही कारवाई करण्यात आली.
४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २.५७ वाजता मुंबई वाहतूक मुख्य नियंत्रण कक्ष, वरळी येथील शासकीय मोबाईल क्रमांकावर अज्ञात इसमाकडून व्हॉट्सअॅपवर धमकीचा संदेश प्राप्त झाला. या संदेशात ४०० किलो आरडिएक्ससह मानवी बॉम्बचा वापर करून संपूर्ण मुंबई उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेली ही धमकी गंभीर असल्याने तत्काळ हालचाल करून तपास सुरू करण्यात आला.
आरोपी अटकेत
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मानवी कौशल्याच्या आधारे आरोपीचा मागोवा घेतला. आरोपीचे नाव अश्विनीकुमार सुरेशकुमार सुप्रा (वय ५० वर्षे) असे असून त्याला उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडील गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे.
पथकाची कामगिरी
ही कारवाई मुंबई गुन्हेशाखेच्या पथकाने पोलिस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त (गुन्हे) शैलश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) राज तिलक रौशन यांच्या नेतृत्वाखाली केली.
नागरिकांना आवाहन
गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अशा धमकीनंतर मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घबराट पसरवू नये. मुंबई पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.


