Mumbai Crime News : “गुन्हे शाखा, मुंबई यांच्याकडुन मोठी कारवाई ; कुख्यात गॅगस्टर प्रसाद पुजारी यास अटक”
मुंबई पोलिसांनी कुख्यात गॅंग स्टार प्रसाद पुजारी याला अटक, वीस वर्षापासून पोलीस घेत होते शोध
मुंबई :- मागील २० वर्षापासुन मुंबई शहरात गोळीबार करून खुन, खुनाचा प्रयत्न, जिवे ठार मारण्याच्या धमकीसह खंडणीची मागणी यासारख्या गंभीर गुन्हयातील आरोपी प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी उर्फ सिध्दार्थ शेट्टी उर्फ सिध्दु उर्फ सिद उर्फ जॉनी याच्या विरुध्द मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद आहेत. आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याने स्वतःची संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करुन त्याच्या गुन्हेगारी टोळीच्या आर्थिक फायदयासह समाजात दहशत निर्माण करणे तसेच गुन्हेगारी जगतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने मागील 20 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून राजकीय व्यक्ती, व्यावसायिक तसेच प्रतिष्ठीत व्यक्तींना खंडणीसाठी धमकावित होता. गुन्हे शाखा, मुंबई मागील बऱ्याच दिवसांपासून आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याच्या मागावर होती.
आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी यांचा इतिहास
आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी हा पुर्वाश्रमीचा गॅगस्टर कुमार पिल्ले, गैंगस्टर छोटा राजन यांच्या गुन्हेगारी टोळीचा हस्तक म्हणुन गुन्हेगारी जगतात सक्रिय होता. गैंगस्टर कुमार पिल्ले व नंतर गॅगस्टर छोटा राजन यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर प्रसाद विठ्ठल पुजारी याने स्वतःची गुन्हेगारी टोळी बनवुन त्याच्या टोळीतील सदस्यांमार्फत मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील गुन्हेगारी विश्वामध्ये दबदबा निर्माण केला होता. त्याचाच भाग म्हणुन त्याच्या हस्तकांमार्फत विक्रोळी येथील राजकीय पक्षाच्या नेत्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्रामधून गोळीबार करवून दहशत निर्माण केली होती. तसेच मुंबईतील सिने जगतामध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठीत निर्माता/दिग्दर्शक व कलाकार यास खंडणीसाठी जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. आरोपी प्रसाद पुजारी याच्या गुन्हेगारी टोळीच्या कारवायांमुळे समाजात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्यासाठी मुंबई पोलीसांनी वेळोवेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन प्रसाद विठ्ठल पुनारी याच्या हस्तकांना अग्निशस्त्रांसह शिताफीने अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुध्द तपासामध्ये सबळ पुरावा प्राप्त करुन त्यांचेविरुध्द मोक्का कायद्याअन्वये स्थापित विशेष न्यायालयासमक्ष खटले दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी काही खटल्यांमध्ये इतर आरोपींविरुध्द गुन्हयाची शाबीती होवुन शिक्षा सुनावण्यात आली असुन काही खटले अद्याप न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहेत. परंतु नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी असलेला संघटीत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख प्रसाद विठ्ठल पुजारी हा परदेशातुन त्याच्या गुन्हेगारी कारवाया करीत असल्यामुळे पोलीसांच्या हाती लागत नव्हता. त्यासाठी गुन्हे शाखा, मुंबई यांचेसह विविध यंत्रणा आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याच्या मागावर होत्या.
गॅगस्टर प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी उर्फ सिध्दार्थ शेट्टी उर्फ सिध्दु उर्फ सिद उर्फ जॉनी हा सन 2004 मध्ये अटक झाल्यानंतर जामीनावर मुक्त झाला व त्यानंतर सन 2005 मध्ये देशाबाहेर पळून गेला होता. परदेशात गेल्यानंतर देखील त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा आलेख हा चढताच राहिला व सन 2023 पर्यंत तो व त्याच्या साथीदारांच्या विरोधात खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी उकळणे, फौजदारपात्र कट रचणे, अवैध अग्निशस्त्रे बाळगणे, तसेच संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत एकुण 08 गंभीर गुन्हे दाखल झाले.
मुंबई पोलीस सदर आरोपीचा विविध देशामध्ये शोध घेत असताना तो चीन व हॉगकॉंग या देशामध्ये वास्तव्यास असल्याचे समजल्याने त्याच्याविरोधात सन 2012 मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. त्यानंतर सन 2023 मध्ये सदर आरोपी विरोधात DEPORTATION / EXTRADITION प्रस्ताव पाठवून त्याचा सातत्याने पाठपुरवा करून बिजींग, चीन देशातुन त्याला भारतात आणण्यास गुन्हे शाखा, मुंबई पोलीसांना यश आले आहे. गुन्हे शाखा, मुंबई यांनी आरोपी प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी उर्फ सिध्दार्थ शेट्टी उर्फ सिध्दु उर्फ सिद उर्फ जॉनी याच्या शोधकामी अतिशय गोपनियरित्या राबविलेल्या मोहिमेला यश येवुन 23 मार्च 2024 रोजी खंडणी विरोधी कक्ष, गु.प्र.शा., गु.अ.वि., मुंबई यांनी आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी यास ताब्यात घेवुन कलम 307,452,120 (ब) भादवि सह कलम 3,25,5,27 हत्यार कायदा सह कलम 3(1) (ii), 3(2), 3(4) मोक्का कायदा 1999 (विक्रोळी पोलीस ठाणे गु.र.क्र. ५०९/२०१९) या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथक
सदरची यशस्वी कामगीरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर CP Vivek Phansalkar, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती Deven Bharti,पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम Lakhmi Gautam, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना Shashikumar Meena, पोलीस उप आयुक्त (प्रतिबंधक) अमोघ गावकर, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) दत्ता नलावडे,सहाय्यक पोलीस आयुक्त (डी विशेष) दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोलीस हवालदार महेश धादवड, पोलीस हवालदार मोहन सुर्वे, इंटरपोल समन्वय कर्यालयाचे पोलीस निरीक्षक महेश पारकर, गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक व कक्ष 7, गु.प्र.शा., गु.अ.वि येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.