Mumbai Crime News : मुंबईत ‘एम.डी.’ चा हाहाकार! एमआयडीसी पोलिसांची ‘ऑपरेशन क्लीन’, अंडरवर्ल्डच्या ड्रग्ज साखळीचा पर्दाफाश

•केमिस्ट लॅबमध्ये चालत होता मृत्यूचा कारखाना! एम.एस्सी. पास डॉक्टरच निघाला ‘एम.डी.’ चा सूत्रधार
मुंबई | मुंबईच्या रस्त्यांवर खुलेआम फिरणाऱ्या ‘एम.डी.’ (मेफेड्रॉन) या मृत्यूच्या सौदागरांना आता एमआयडीसी पोलिसांनी जोरदार धक्का दिला आहे! एखाद्या थरारक हिंदी चित्रपटाला लाजवेल अशा धाडसी कारवाईत, मुंबई पोलिसांनी ‘एम.डी.’ च्या उत्पादन आणि विक्रीच्या एका आंतरराज्यीय महासाखळीचा बुरखा फाडला आहे. या ‘ऑपरेशन क्लीन’ मध्ये, पोलिसांनी तीन मोठ्या माशांना गजाआड केले असून, त्यांच्याकडून तब्बल 22 लाख 64 हजार किंमतीचा 566 ग्रॅम ‘एम.डी.’ सह एकूण 36 लाख 57 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडले आहे!
थरारक पाठलाग आणि पहिला धक्का!
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत ‘एम.डी.’ चा वाढता सुळसुळाट पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता. पण अखेर 7 जून 2025 च्या रात्री एमआयडीसी पोलिसांना एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीने या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली. रात्री पावणे बाराच्या सुमारास, पंप हाऊस सब-वेकडून भरधाव वेगाने कनोसा जंक्शनकडे जाणाऱ्या एका लाल रंगाच्या स्कोडा कारवर गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक महेंद्र खांगळ आणि त्यांच्या पथकाची करडी नजर पडली. क्षणाचाही विलंब न लावता, पोलिसांनी त्या संशयित स्कोडा कारचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला.
कार चालक फरहान गुलजार खान (वय 36) याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, पोलिसांना धक्काच बसला. त्याच्याजवळ 2 लाख 80 हजार किंमतीचा 71 ग्रॅम ‘एम.डी.’ चा साठा आणि 8 लाख किंमतीची त्याची स्कोडा कार जप्त करण्यात आली. फरहान हा काही साधासुधा गुन्हेगार नव्हता, तर त्याच्यावर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांत शरीराविरुद्धचे आणि मालमत्तेविषयक असे तब्बल 13 गुन्हे दाखल होते.
ड्रग्ज पुरवठ्याचा ‘स्विफ्ट’ मार्ग पालघरपर्यंत!
फरहानच्या अटकेनंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवली. तांत्रिक विश्लेषण आणि अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी फरहानला ‘एम.डी.’ पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या संशयिताचा माग काढला. प्रतीक सुदर्शन जाधव (वय 24,रा. पालघर) हा ‘एम.डी.’ चा वितरक असल्याचे निष्पन्न झाले. 10 जून 2025 रोजी पालघर परिसरातून, अत्यंत कौशल्याने पोलिसांनी प्रतिकला त्याच्या मारुती स्विफ्ट डीझायर कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून 8 लाख 60 हजार) किमतीचा 215 ग्रॅम ‘एम.डी.’ आणि त्याची 4 लाख 60 हजार किंमतीची स्विफ्ट कार जप्त करण्यात आली.
तात्काळ, एमआयडीसी पोलिसांनी विजय खटकेच्या बोईसर येथील तारापूर एमआयडीसीतील ‘मीना केमिकल्स’ या कंपनीच्या ‘प्रोकेम फार्मास्युटीकल लॅब’ वर छापा टाकला. हा छापा म्हणजे एकाप्रकारे ‘मृत्यूच्या कारखान्याचा’ पर्दाफाश होता! या छाप्यात, पोलिसांनी विक्रीसाठी तयार केलेला 11 लाख 20 हजार किमतीचा 280 ग्रॅम ‘एम.डी.’ आणि या अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी लागणारे कच्चे साहित्य तसेच आवश्यक उपकरणे मोठ्या प्रमाणात जप्त केली.
पोलिसांना 7 दिवसांची कोठडी; ‘ऑपरेशन क्लीन’ सुरूच!
आज या तिन्ही आरोपींना अंधेरी येथील माननीय न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक महेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील पथक या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे. या धाडसी कारवाईमुळे मुंबईतील अंमली पदार्थांच्या व्यवसायाला मोठा हादरा बसला असून, या रॅकेटमधील आणखी काही मोठे नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एमआयडीसी पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे ‘ड्रग्जमुक्त मुंबई’ च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे!
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वात, सह आयुक्त सत्यनारायण, अपर आयुक्त परमजीत सिंह दहिया, उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण, पोलीस निरीक्षक महेश गुरव, उपनिरीक्षक महेंद्र खांगळ, आनंद काशीद, महादेव जगताप आणि हवालदार राजु इटकर, टायगर मंडले, गौतम बडे, विशाल पिसाळ तसेच शिपाई अभिजीत शहाणे, सदानंद भावसार, संदेश देसाई, निलेश साळुंखे, वाघमारे, लोखंडे, अवघडे यांच्या पथकाने ‘एम.डी.’ औषध उत्पादन व विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत 22.64 लाख रुपयांचे 566 ग्रॅम ‘एम.डी.’ सह एकूण 36.57 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.



