Mumbai Crime News : 1.65 कोटीचा अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी चौघांना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई

•31 डिसेंबर दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांची मुंबईच्या देवनार, कुर्ला, आग्रीपाडा परिसरात धडक कारवाई, कोकेन,कोडेन बॉटल्स्,एम.डी कोट्यावधीचा अंमली पदार्थ जप्त,चार तस्करी करणाऱ्या ड्रग्ज तस्करांना जेरबंद, दोन परदेशी नागरिकांचा समावेश
मुंबई :- जगभरात नववर्षाच्या स्वागताकरिता मोठ्या प्रमाणात झिंगाट पार्ट्यांचे आयोजित केले जाते. ओल्या सुक्या पार्ट्यांसोबतच या पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थाचे सेवनही मोठ्या प्रमाणात होत असताना मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या युनिटने 1 जानेवारीच्या दरम्यान कारवाई करत देवनार, कुर्ला, आग्रीपाडा परिसरात कारवाई करत पोलिसांनी तब्बल 900 कोडेन बॉटल्स,396 ग्रॅम कोकेन,170 ग्रॅम एम.डी असा एकूण 1.65 कोट्यावधीचा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार ड्रग्ज तस्करांना जेरबंद केले असून त्यामध्ये दोन नायजेरियन नागरिकांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
1 जानेवारी 25 दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेली कारवाई
विशेष मोहिमेदरम्यान अंमली पदार्थ विरोधी कक्षाने केलेल्या कारवाईत घाटकोपर युनिट अ.प.वि. कक्ष यांनी 1 जानेवारी 25 रोजी देवनार, गोवंडी, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे छुप्या पध्दतीने ‘कोडेन’ फॉस्फेट मिश्रीत बॉटल्स् हा अंमली पदार्थ विक्री करणारा नयुम शेख,(वय 28 ), यास ताब्यात घेतले. आरोपीचे ताब्यातून ‘900 कोडेन’ मिश्रीत बॉटल्स् हा अंमली पदार्थ किंमत अंदाजे रूपये 4.50 लाख किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. नमूद अटक आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घाटकोपर युनिट, अं.प.वि. कक्ष यांनी केलेल्या दुसऱ्या कारवाईत कुर्ला (पुर्व) परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे ‘कोकेन’ अंमली पदार्थ विक्री करणारा संजीब सरकार,(वय 40) यास ताब्यात घेतले. आरोपीचे ताब्यातून एकुन ‘396 ग्रॅम कोकेन’ हा अंमली पदार्थ किंमत अंदाजे रूपये 1 कोटी 18 लाख 80 हजार किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. नमूद अटक आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्हयाचा पुढील तपास घाटकोपर युनिट करत आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरळी युनिटने 1 जानेवारी 25 रोजी आग्रीपाडा, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे मॅफेड्रॉन विक्री करणाऱ्या दोन नायझेरियन नागरीकांना ताब्यात घेतले असता मोहम्मद बाप्टिस्टा, (24 वय) यांच्या ताब्यातुन 100 ग्रॅम वजनाचा एम.डी. व फेथ इग्नीबोसा, (वय 25) , हिचे ताब्यातुन 70 ग्रॅम वजनाचा एम.डी. असा एकुन 170 ग्रॅम एम. डी. हा अंमली पदार्थ किंमत अंदाजे रूपये 42 लाख 50 हजार रुपयांचे जप्त करण्यात आला. दोन्ही नायझेरियन अटक आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमूद गुन्हयाचा पुढील तपास वरळी युनिट करत आहे.
पोलीस पथक
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशिकुमार मीना,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले, वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांचे नेतृत्वाखाली अंमली विरोधी कक्षाच्या पथकांनी केली आहे.