मुंबई

Mumbai Crime News : गावदेवीतील उच्चभ्रू परिसरात वृद्धाची हत्या; सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी जेरबंद

56 वर्षीय अरविंद जाधव यांच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार; वाद विकोपाला गेल्याने हत्या झाल्याचे निष्पन्न

मुंबई :- मुंबईच्या उच्चभ्रू गावदेवी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हत्येमुळे खळबळ उडाली आहे. कारमायकल रोड येथील पदपथावर 56 वर्षीय अरविंद आत्माराम जाधव यांचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली आहे. हा वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या आरोपीने जाधव यांच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मंगळवारी सकाळी गावदेवी येथील कारमायकल रोडवरील मारबोलो कंपाऊंडजवळील पदपथावर अरविंद जाधव यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यांच्या कपाळाच्या मध्यभागी गंभीर प्रहार झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेदरम्यान हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. सुरुवातीला अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र अरविंद यांचे भाऊ अनिल जाधव (जे कारमायकल रोडवरील चेअरमन बंगल्यात राहतात) यांच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी हत्येचा गुन्हा (भारतीय न्याय संहिता कलम 103) दाखल केला.

या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गावदेवी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीमध्ये एका तरुणाचा या घटनेतील सहभाग स्पष्टपणे दिसून आला. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवली आणि गावदेवी येथील दर्या सागर झोपडपट्टीतून वेदप्रकाश कौशल मिश्रा (28 वय) याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता, मिश्राने आपला गुन्ह्यातील सहभाग कबूल केला. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वेदप्रकाश मिश्रा आणि मृत अरविंद जाधव यांच्यात वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या आरोपीने जाधव यांच्या डोक्यात टणक वस्तूने जोरदार प्रहार केला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हत्येसाठी वापरलेले शस्त्र अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून, त्याबाबत आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, अहवाल अद्याप प्रलंबित असला तरी, डोक्यावरील गंभीर जखमांमुळेच जाधव यांचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेने मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

vivek

Recent Posts