Mumbai Crime News : मुंबईत 10 कोटींचे ड्रग्ज जप्त; ‘एमडी’ तस्करांची साखळी उद्ध्वस्त, पाच जण जेरबंद

•गुन्हे शाखा मुंबईची धडाकेबाज कारवाई; मालाड, जोगेश्वरी, दादरमध्ये ड्रग्जची मोठी खेप पकडली
मुंबई :- मुंबईला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. वेगवेगळ्या परिसरात केलेल्या चार मोठ्या कारवाईत पोलिसांनी तब्बल 10 कोटींहून अधिक किमतीचे 4 किलो ‘मेफेड्रॉन’ (एमडी) हे ड्रग्ज जप्त केले असून, पाच मोठ्या तस्करांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. मुंबईत ‘एमडी’ ड्रग्जची मोठी साखळी सक्रिय असल्याची माहिती या कारवाईतून समोर आली आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या तीन युनिट्सने (घाटकोपर, बांद्रा, वरळी) वेगवेगळ्या ठिकाणी केली. यापैकी, जोगेश्वरी पश्चिम येथे गस्त घालत असताना एका संशयिताच्या ताब्यातून 504 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. त्याच्या चौकशीतून आणखी एका सहकाऱ्याला पकडण्यात आले आणि त्याच्याकडून 518 ग्रॅम एमडी हस्तगत करण्यात आले. एकूण 1.022 किलो एमडी ड्रग्जसह या दोन आरोपींना अटक करण्यात आली.
मुंबईच्या ड्रग्ज साखळीमध्ये नायजेरियन नागरिकांचा सहभाग असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बांद्रा युनिटने एका जुन्या गुन्ह्याच्या तपासात एका नायजेरियन तस्कराला नवी मुंबईतील एमआयडीसी परिसरातून अटक केली. त्याच्याकडून तब्बल 1.024 किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. याव्यतिरिक्त, मालाड पूर्व आणि दादर पश्चिम येथेही केलेल्या स्वतंत्र कारवाईत पोलिसांनी अनुक्रमे 766 ग्रॅम आणि 690 ग्रॅम एमडी जप्त केले. या दोन ठिकाणीही दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एकूण चार मोठ्या कारवाईमध्ये, मुंबईतल्या गल्ल्यांमध्ये पसरलेल्या या ड्रग्जच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी या पाच आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी अधिक तपास सुरू आहे. मुंबईकरांना अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत कोणतीही माहिती असल्यास ती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून अशा ड्रग्ज माफियांचा कायमचा बंदोबस्त करता येईल.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे नवनाथ ढवळे व सहाय्यक पोलीस आयुक्त अ.प.वि.कक्ष, गुन्हे सुधीर हिरडेकर, यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, बांदा युनिट चे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, घाटकोपर युनिट चे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले आणि वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांचे नेतृत्वाखाली त्यांचे अंमली पदार्थ विरोधी पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे



