Mumbai Crime News : हीरे व्यापाऱ्यांची फसवणूक! दलालांनी दोन व्यापाऱ्यांना घातला कोट्यवधींचा गंडा

•बीकेसी परिसरात दोन वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये 52 लाखांची फसवणूक
मुंबई | बीकेसीतील हिरे बाजारात विश्वासाच्या आधारे होणाऱ्या व्यवहारांनी पुन्हा एकदा धक्का बसवला आहे. दोन नामवंत हिरे व्यापाऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, दोन्ही प्रकरणांमध्ये दलालांनी विक्रीसाठी हिरे घेतले आणि त्यानंतर गायब झाले. यामुळे एकाच दिवशी बीकेसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात ‘श्री रामदूत जेम्स एलएलपी’ या कंपनीचे मालक मनोजभाई अमदावादी यांची तब्बल 39 लाख रुपयांची फसवणूक झाली. आरोपी दलाल जयनिश डहयानी याने पुर्वीचे व्यवहार प्रामाणिकपणे पूर्ण केल्यामुळे कंपनीचा त्याच्यावर विश्वास बसला होता. फेब्रुवारी 2024 मध्ये त्याने मोठ्या ऑर्डरचे कारण सांगून तीन टप्प्यांमध्ये जवळपास 24.66 कॅरेटचे हिरे विक्रीसाठी घेतले. मात्र व्यवहार पूर्ण झाल्यानंतर डहयानी पैसे चुकवण्यास टाळाटाळ करत राहिला. अखेर कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली. डहयानीविरोधात IPC कलम 409,420 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात ‘जे.ए.एम्पेक्स’ या कंपनीचे मालक घनश्याम कालसरिया यांची 13 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपी सिद्धार्थ रावसा हा मागील तीन वर्षांपासून त्यांच्याकडे व्यवहार करत होता. डिसेंबर 2024 मध्ये त्याने विक्रीसाठी 27.41 कॅरेटचे हिरे घेतले. मात्र ठरलेल्या वेळेत पैसे न देता विविध कारणांनी वेळकाढूपणा करत राहिला. अखेर कालसरिया यांनीही तक्रार दाखल केली असून, रावसाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4) व 316(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


