Monsoon Update : राज्यात पावसाचे थैमान : 10 लाख एकर जमीन पाण्याखाली,जीवितहानी वाढण्याची शक्यता

•उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली नुकसानीची माहिती; पूरग्रस्त भागातून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर
मुंबई :- गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला आणि राज्यात सुमारे 10 लाख एकर जमीन पाण्याखाली गेल्याची माहिती दिली. पूरग्रस्त भागांतून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मुंबईसह अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरांसाठी पुढील 12 तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तसेच, मुंबई उपनगर, पालघर आणि रत्नागिरी जिल्ह्यालाही ‘रेड अलर्ट’ असून, राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मिठी नदीची पाणी पातळी वाढत असल्याने मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.
धरण व्यवस्थापनाची खबरदारी
अजित पवार यांनी सांगितले की, राज्यातील बहुतांश धरणे भरली असून, पाणी सोडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आले आहेत. प्रत्येक धरणावर कार्यकारी अभियंता दर्जाचा अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच, शेजारच्या राज्यांशी समन्वय साधला जात आहे, जेणेकरून पुराचे पाणी योग्यरित्या नियंत्रित करता येईल.
राज्यात अनेक ठिकाणी जीवितहानी झाली असून, त्याबाबतची आकडेवारी लवकरच जाहीर केली जाईल. रत्नागिरी, खेड, चिपळूण यांसारख्या भागांत नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हावर आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात जनावरे वाहून गेल्याचेही समोर आले आहे. पूरग्रस्त गावांमध्ये बोटींच्या सहाय्याने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, त्यात राज्यातील परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली जाईल. सर्व शासकीय यंत्रणा सतर्क असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी राज्यातील जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.


