Mumbai Crime News : ‘तोतया’ पोलिसांकडून व्यापाऱ्याची 10 लाखांची फसवणूक!

• वांद्रे स्थानकावर घडला प्रकार; दोन आरोपींना अटक, खरे रेल्वे पोलीस सहभागी आहेत का, तपास सुरू
मुंबई :- मुंबई आणि वसईमध्ये रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांची लूट झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता वांद्रे रेल्वे स्थानकावर दोन तोतया पोलिसांनी एका व्यापाऱ्याची 10 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली असून, यामागे खरे पोलीस आहेत का, याचा तपास सुरू आहे.
नेमका प्रकार काय?
मालाड येथे राहणारे व्यावसायिक विकास गुप्ता हे कपड्यांच्या खरेदीसाठी सोमवारी गुजरातला जाण्यासाठी वांद्रे टर्मिनस येथे आले होते. रेल्वे कॅन्टीनजवळ उभे असताना, दोन अनोळखी व्यक्तींनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून त्यांना अडवले. “कुठे जात आहात?” आणि “तुमच्या बॅगेत काय आहे?” अशी विचारणा त्यांनी केली.
बॅगेची तपासणी केली असता, त्यात 10 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम आढळली. आरोपींनी गुप्ता यांच्याकडे या रकमेचा पुरावा मागितला. त्यावेळी पुरावा नसल्याने गुप्ता घाबरून गेले. याचा फायदा घेत आरोपींनी ती रक्कम ताब्यात घेतली आणि ती परत मिळणार नाही असे सांगून तेथून पळ काढला. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुप्ता यांनी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दोघे आरोपींना अटक
गुप्ता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि या प्रकरणी निलेश कळसुलकर (वय 45) आणि प्रवीण शुक्ला (वय 32) या दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेची माहिती देताना लोहमार्ग पोलीस, पश्चिम परिमंडळाच्या पोलीस उपायुक्त सुनीता ठाकरे यांनी सांगितले की, “आम्ही तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून, यात खरे रेल्वे पोलीस समाविष्ट आहेत का, याचा तपास सुरू आहे.”


