Deepak Kesarkar : 100 फुटाचा पुतळा उभारण्यात येणार! मंत्री दीपक केसरकर
•पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी बोलावणार.. मंत्री दीपक केसरकर
मुंबई :- सिंधुदुर्ग राजकोट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 महिन्यांपूर्वीच उद्घाटन झाले होते. यामुळे संताप व्यक्त केला जात असतानाच आता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राजकोट परिसरात पुन्हा 100 फुट उंच शिवरायांचा पुतळा बांधण्याचे व त्याचे पुन्हा पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्याचे संकेत दिले आहेत.
दीपक केसरकर मंगळवारी या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सदर घटनेवरून कुणालाही राजकारण करण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याची स्थापना करणारे पहिले राजे होते. ते पहिले नौसैनिक राजेही होते. घडली ती घटना अतिशय दुःखद आहे. कोसळलेला पुतळा नौदलाने बांधला होता. त्याची उंची 28 फूट होती. परंतु नागरिकांची मागणी या ठिकाणी शिवरायांचा 100 फुटांचा पुतळा उभारण्याची होती. आता स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन हा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करू शकते. हा 100 फुटी पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा या पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी बोलावण्यात येईल. यावेळी भव्य स्मारक उभारून या परिसराचा विकास करता येईल.