Mumbai Crime News : एक वर्षांनंतर ‘दारुड्या’ मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

• एक वर्षांनंतर ‘दारुड्या’ मारेकऱ्याच्या मुसक्या आवळल्या!•धारावीतील खून प्रकरणातील फरार आरोपी मीरारोडमधून जेरबंद
मुंबई :- धारावी पोलीस ठाण्यात वर्षभरापूर्वी दाखल झालेल्या एका हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मीरारोड येथे दारूच्या नशेत आपण धारावीत खून केल्याचे सांगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या मोहम्मद उस्मान मोहम्मद असिफ (26 वय ) याला धारावी पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तब्बल एक वर्षांच्या अथक शोधमोहिमेनंतर, आरोपीच्या स्वतःच्याच बडबडीमुळे तो पोलिसांच्या हाती लागला.
वर्षभरापूर्वी धारावीत रस्ता ओलांडण्यावरून झालेल्या वादातून एका 25 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात तीन ते चार आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती, मात्र त्यांचा साथीदार मोहम्मद उस्मान मोहम्मद असिफ हा फरार झाला होता. धारावी पोलीस त्याचा कसून शोध घेत असतानाही त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव कदम यांना एका खबऱ्याकडून महत्त्वाची माहिती मिळाली. मीरारोड परिसरात एक व्यक्ती दारूच्या नशेत आपण धारावीत खून केल्याचे सांगत असून, पोलीस आपल्याला पकडू शकत नसल्याचे बोलून लोकांना धमकावत आहे. विशेष म्हणजे, त्याच्या एका हातात व्यंग असल्याचेही खबऱ्याने सांगितले. ही माहिती मिळताच, वरिष्ठ निरीक्षक राजा बिडकर आणि निरीक्षक संगीता माने यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव कदम यांनी आपल्या पथकासह तात्काळ मीरारोड येथील नयानगर गाठले. खबऱ्याने सांगितलेली शारीरिक खूण आणि आरोपीचे दारू पिऊन बढाया मारणे, यामुळे तो मोहम्मद उस्मानच असल्याची खात्री पोलिसांना पटली.
आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन दिवस वेषांतर करून परिसरात सापळा रचला होता. अखेर मोहम्मद उस्मान समोर येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला धारावीत आणले. पोलिसांनी यासंदर्भात चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी मोहम्मद उस्मान मोहम्मद असिफ विरोधात यापूर्वीही अंमली पदार्थ सेवन आणि एका व्यक्तीला धमकावल्याप्रकरणी जुने गुन्हे दाखल आहेत. धारावीत झालेल्या हत्येच्या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 103 (2), 351 (2), 3 (5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याने धारावी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वर्षभराने का होईना, पण या खून प्रकरणातील फरारी आरोपीला अटक झाल्यामुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.


