महाराष्ट्र

Mumbai Crime News : बनावट ‘फोन पे’ ॲप वापरून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक

•काशीमिरा पोलिसांचे यश; गुजरातचा आरोपी बोरिवलीतून ताब्यात

मीरा-भाईंदर :- बनावट “फोन पे” ॲपचा वापर करून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत आरोपीला काशीमिरा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने एका बॅटरी दुकानदाराला 17,300 रुपयांची फसवणूक करून बॅटरी चोरली होती. पोलिसांनी गुजरात येथील या आरोपीला बोरिवलीतून अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार कार आणि चोरीची बॅटरी जप्त केली आहे.

ही घटना 7 ऑगस्ट 2025 रोजी मीरा रोड पूर्व येथील एका बॅटरीच्या दुकानात घडली. खुशाल दिलीप सोनार नावाचे दुकानदार त्यांच्या दुकानात असताना एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने 17,300 रुपयांची चारचाकी वाहनाची बॅटरी खरेदी केली. पैसे देण्यासाठी त्याने आपल्या मोबाईलमधील बनावट फोन पे ॲपचा स्क्रीनशॉट दाखवला. तो पैसे पाठवल्याचे भासवून बॅटरी घेऊन निघून गेला. फिर्यादीच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी 10 ऑगस्ट रोजी काशीमिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुन्ह्याचा तपास करत असताना, काशीमिरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक माहिती आणि कौशल्याच्या जोरावर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. आरोपीचे नाव वलय कल्पीतकुमार सोलंकी (वय 26) असून तो गुजरातच्या वडोदरा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी त्याला बोरिवली, मुंबई येथे त्याने गुन्ह्यात वापरलेल्या मारुती सुझुकी स्विफ्ट मोटार कारसह ताब्यात घेतले. 14 ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली एक्सीड कंपनीची बॅटरी आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि पुढील तपास सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त राहुल चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात सहायक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0