Mumbai Crime News : उत्खननातील सोने’ सांगून 25 लाखांचा गंडा! – मालाड पोलिसांचा गुजरातपर्यंत थरारक पाठलाग; चार आंतरराज्यीय ठगांना अटक, 15.45 लाख रुपये जप्त

•बाबुलाल वाघेला टोळीचा पर्दाफाश; वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची यशस्वी मोहीम; अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता
मुंबई :- मुंबईतील मालाड येथील एका व्यापाऱ्याला ‘मंदिरामागील खोदकामात मिळालेले सोने’ विकण्याच्या बहाण्याने 25 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला मालाड पोलिसांनी अटक करून मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. अत्यंत गुप्त आणि तांत्रिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी या टोळीचा गुजरात आणि विरारमधून पर्दाफाश केला.
गुन्हेगारांची पद्धत
मालाड पश्चिमेकडील भांडी व्यापारी दिनेश मेहता यांना लक्ष्य करून, टोळीतील मुख्य आरोपी बाबुलाल भागलाराम वाघेला (वय 55) याने ‘राजस्थानी’ असल्याचे भासवून ओळख वाढवली. त्याने मेहता यांना नाशिकमध्ये मिळालेली सोन्याची बोरमाळ विकण्याचे आमिष दाखवले. नमुना म्हणून दिलेले सोन्याचे मणी खरे असल्याने मेहतांचा विश्वास बसला आणि त्यांनी 25 लाख रुपये रोख दिले, पण प्रत्यक्षात त्यांना कॉपर आणि निकेल धातूची बनावट बोरमाळ मिळाली.
पोलीस पथकाची कारवाई आणि अधिकारी
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन, अपर पोलीस आयुक्त शशीकुमार मीना आणि पोलीस उप आयुक्त संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बागल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांनी तपास सुरू केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे प्रकटीकरण पथक, ज्याचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक रायवाडे यांनी केले, त्यांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला.सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक रायवाडे, पोलीस हवालदार जयदिप जुवाटकर,जॉन फर्नांडीस,मंदार गोंजारी, पोलीस शिपाई समाधान वाघ,सुजय शेरे, विक्रम बाबर आणि पोलीस शिपाई आदित्य राणे या पथकाने थेट गुजरातच्या कलोल येथे जाऊन मुख्य आरोपी बाबुलाल भागलाराम वाघेला याला ताब्यात घेतले.
त्यानंतर बाबुलालच्या माहितीवरून त्याचे साथीदार मंगलाराम मनाराम वाघरी (वय 34), केसाराम भगताराम वाघरी (वय 41) आणि भवरलाल बाबुलाल वाघरी (वय 48) या तिघांना विरार फाटा, पूर्व येथून अटक करण्यात आली.
गुन्हेगारांची पार्श्वभूमी
अटक केलेले हे सर्व आरोपी मूळचे राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातील असून, त्यांचा अशा फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये हातखंडा आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीच्या घरून रोख 15 लाख 45 हजार रुपये जप्त केले आहेत. या टोळीने अंधेरीतील एका अत्तर व्यापाऱ्याचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.


