क्राईम न्यूज

Mumbai Crime News : 21 वर्षीय तरुणीला अश्लील फोटोच्या आधारे ब्लॅकमेल; प्रियकरकडून 2.40 लाखांची खंडणी

Mumbai Latest Crime News : 6 महिन्यांच्या कालावधीत सतत पैसे उकळले; धमकी देणाऱ्या प्रियकराला अटक, मित्र फरार; आईलाही बलात्काराची धमकी

मुंबई | हरियाणामधून शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीच्या आयुष्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या प्रियकराने तिचे अश्लील फोटो व व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत तब्बल 2 लाख 40 हजारांची खंडणी उकळली. आणखी धक्कादायक बाब म्हणजे तिच्या प्रियकराच्या मित्रालाही हे फोटो दाखवून दोघांनी मिळून तिला धमकावले. या प्रकरणी प्रियकराला अटक करण्यात आली असून त्याचा मित्र अद्याप फरार आहे.

पीडित तरुणी आणि आरोपी युवक यांच्यात मुंबईतील महाविद्यालयात ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि नंतर दोघं लिव्ह-इनमध्ये राहत होते. मात्र नातं बिघडल्यानंतर पीडित तरुणी वेगळी झाली. त्यानंतर सुरू झाला ब्लॅकमेलचा कट. प्रियकराने तिचे खासगी फोटो मित्राला दाखवले आणि दोघांनी मिळून तिला पैसे देण्यास भाग पाडलं.

तरुणीकडून टप्प्याटप्प्याने 2.40 लाख रुपये उकळण्यात आले. पैसे न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ते तिची सतत मानसिक छळवणूक करत होते. मुलगी सतत घरून पैसे घेत असल्यामुळे तिच्या आईला संशय आला. सुरुवातीला तरुणीने कारणं दिली, मात्र नंतर तिने सगळा प्रकार उघड केला.आईने आरोपी प्रियकराशी संपर्क साधल्यावर, आईलाही धमकी देण्यात आली – तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

15 जुलै रोजी या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 61(1), 308(2), 351(3) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रियकराला अटक केली असून त्याचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. दुसरा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

vivek

Recent Posts