मुंबई

Mumbai Corona Update : राज्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव! 84 नव्या रुग्णांसह एकूण आकडा 681 वर

मुंबईत सर्वाधिक 32 रुग्ण; पुणे, ठाणे व कोकणातही वाढती नोंद

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे सावट गडद होत असून, शुक्रवारी नव्याने 84 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह जानेवारी 2025 पासून आतापर्यंतची एकूण संख्या 681 वर पोहोचली आहे. बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणांसह असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे.

नव्या बुलेटिननुसार, मुंबईत 32 नवीन रुग्ण आढळले असून, ही संख्या मागील दिवसाच्या तुलनेत 5 ने वाढली आहे. ठाणे जिल्हा व महानगर क्षेत्रात मिळून 16, पुणे महापालिका हद्दीत 19, पिंपरी चिंचवडमध्ये 3, कोल्हापूर व सांगलीसह अन्य जिल्ह्यांमध्ये उर्वरित रुग्ण आढळले.

चार नव्या ओमिक्रॉन सब-वेरिएंट्सची चिन्हे, पण घाबरू नका – आरोग्य विभागाचा सल्ला

महत्त्वाचे म्हणजे, राज्यात सध्या आढळत असलेल्या रुग्णांमध्ये ओमिक्रॉनच्या चार नव्या सब-वेरिएंट्सची उपस्थिती स्पष्ट झाली आहे. हे सर्व वेरिएंट्स जलद गतीने फैलावणारे असूनही सौम्य लक्षणांतच अडकले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून, सतर्क राहणे आणि मास्क, सॅनिटायझर यांसारख्या खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात, असा सल्ला सरकारने दिला आहे.

सध्या राज्यात 467 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण 10,324 नमुन्यांची तपासणी झाली असून त्यातील 681 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, कोविडची तपासणी व उपचारासाठी पुरेशा सुविधा सज्ज आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर भर द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

vivek

Recent Posts