Mumbai Coastal Road Inauguration : कोस्टल रोड-वांद्रे सी-लिंक मार्गाचे आज (12 सप्टेंबर) उद्घाटन
Eknath Shinde will inaugurate Coastal Road to C-Link route today मरीन ड्राइव्हवरून थेट बांद्र्यात 12 मिनिटांत
मुंबई :- मुंबईकरांना वाहतुकी कोंडी पासून आता सुटका मिळणार असून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुसाट होणार आहे. महत्त्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी- लिंकला जोडण्याचे काम पूर्ण आहे. आजपासून या मार्गावरील प्रवास आता सुसाट होणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोड ते सी-लिंक मार्गाचे उद्घाटन होणार आहे.
बिंदू माधव चौकातून हिरवा कंदील दाखवल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. या मार्गामुळे मरीन ड्राइव्हवरून थेट वांद्रेपर्यंत 12 मिनिटांत पोहोचता येणार आहे. या प्रकल्पामुळे 70 टक्के वेळ आणि 34 टक्के इंधनाची बचत होईल. कोस्टल रोडचे 10 टक्के काम पूर्ण झाले असून, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे.
या प्रकल्पातील मुख्य टप्पा असलेला 136मीटरचा पट्टा सर्वांत मोठ्या बो स्टिंग आर्च गर्डरने जोडण्यात आला आहे. दोन हजार मेट्रिक टन वजनाचा महाकाय गर्डर जोडण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे आता कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे जोडला गेल्याने वांद्रयाहून दक्षिण मुंबईत प्रवास वेगाने करता येणार आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट झाल्यानं वरळीच्या बिंदू माधव चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी अपेक्षा आहे.