Mumbai Bribe News : “पोलीस निरीक्षकाच्या घरी ‘सत्य’ नव्हे, ‘संपत्तीचा स्फोट’!”

•297% अपसंपदा — सतीश कदम यांच्यावर ACB चा कारवाई,3 कोटी 48 लाखांची जादा मालमत्ता उघड; रंगेहाथ लाच घेताना अटकेत आलेल्या अधिकार्यावर आता अपसंपदेचा गुन्हा
मुंबई | न्यायाची रक्षा करणाऱ्या वर्दीतूनच भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ उगम पावत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एनआरआय सागरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश संभाजी कदम यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल 297 टक्के अधिक संपत्तीचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला आहे.
कदम यांना यापूर्वी रंगेहाथ लाच घेताना पकडण्यात आले होते, त्यानंतर त्यांच्या मालमत्तेचा सखोल तपास करण्यात आला. चौकशीत त्यांच्या नावावर 3 कोटी 48 लाखांहून अधिक जादा संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या वैध उत्पन्नाच्या तुलनेत ही मालमत्ता अनेकपट अधिक असून, ती अपसंपदा ठरवली गेली आहे.
ही कारवाई दि. 01 डिसेंबर 2013 ते 09 ऑक्टोबर 2024 या कालावधीतील आर्थिक व्यवहारांच्या तपासातून समोर आली आहे. तक्रार पोलीस निरीक्षक कृष्णा बबन मेखले यांनी दाखल केली असून, तपासाची सूत्रे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश शिरसाठ यांच्या हाती आहेत.
नेमकं काय प्रकरण आहे?
शाहबाज गाव येथे इमारत ढासळल्याची घटना सप्टेंबर-2024 महिन्यात घडली होती. या दुर्घटने प्रकरणी जागा मालक, विकासक यांच्यासोबत गुंतवणूकदार महेश कुंभार याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महेश कुंभार यांचा दुर्घटनेशी संबंध नसतानाही त्यांना जाणीवपूर्वक अडकवले गेल्याचा कुटुंबीयांचा आरोप होता. या गुन्ह्यात सहकार्यासाठी एनआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश कदम यांनी कुंभार यांच्याकडे 50 लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. तडजोड अंती त्यांनी 12 लाख रुपये स्वीकारले होते असेही तक्रारदाराचा आरोप आहे. त्यानंतर कुंभार यांच्यावर इतर एक कारवाईचा धाक दाखवून त्यांच्या मुलाकडे 12 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोड करुन 4 लाख रुपये घेण्याची तयारी कदम यांनी दाखवली होती. मात्र पैशांसाठी त्यांच्याकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या मुंबईच्या मुख्य विभागाकडे तक्रार केली होती. त्यांना 9 ऑक्टोबर 2024 उलवे येथे सतीश कदम यांच्या राहत्या परिसरात सापळा रचून लाचेचे 4 लाख रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


