Mumbai Bomb Threat : मुंबईतील रेल्वे स्थानके बॉम्बने उडवण्याची धमकी; निनावी फोनमुळे खळबळ, पोलिसांनी तपासणी केली

Mumbai Latest Bomb Threat Call : धमकीचा फोन अफवा असल्याचे स्पष्ट; फोन करणाऱ्याचा शोध सुरू
मुंबई :- स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रेल्वे स्थानके आणि लोकलमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देणारा एक निनावी फोन आल्याने खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी हा दूरध्वनी पोलीस महासंचालकांच्या नियंत्रण कक्षात आला होता. यानंतर, पोलिसांनी तात्काळ सर्व रेल्वे स्थानकांवर कसून तपासणी केली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. Mumbai Latest Bomb Threat Call
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून “मुंबईतील रेल्वेमध्ये बॉम्ब ठेवला आहे आणि लवकरच स्फोट घडविण्यात येणार आहे,” अशी माहिती दिली. त्यानंतर तात्काळ त्याने फोन ठेवला. पोलिसांनी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद होता.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी अधिक असल्याने, हा दूरध्वनी गांभीर्याने घेण्यात आला. फोन करणाऱ्याने नेमके ठिकाण सांगितले नव्हते, फक्त ‘मुंबई रेल्वे’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे सर्व रेल्वे पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रात्रभर सर्व प्रमुख स्थानके आणि लोकल गाड्यांची कसून तपासणी करण्यात आली.
तपासाअंती, पोलिसांना कोणत्याही ठिकाणी काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यामुळे हा दूरध्वनी एक अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून शाळा, शासकीय कार्यालये आणि दूतावासांना अशाच प्रकारे धमक्या येत असल्याने पोलिसांनी हा फोनही एक ‘प्रॅंक कॉल’ मानला आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या बंदोबस्तात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पुढील तपास सुरू असून, फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.


