Mumbai Bomb Threat : मुंबईतील पंचतारांकित हॉटेलला बॉम्बस्फोटाची धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

•वरळीतील ‘फोर सिझन्स’ हॉटेलला आला ईमेल; अज्ञात व्यक्तीने ‘लोकलमध्ये बॉम्ब’ ठेवल्याचाही दिला फोन
मुंबई :- मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्यांचे सत्र सुरूच असून, आता वरळीतील एका पंचतारांकित हॉटेललाही बॉम्बस्फोटाचा ई-मेल प्राप्त झाला आहे. बुधवारी रात्री हा ई-मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ तपासणी सुरू केली. यापूर्वी मुंबईतील शाळा, शासकीय कार्यालये आणि दूतावासांनाही अशाच धमक्या मिळाल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘फोर सिझन्स’ हॉटेलला बुधवारी रात्री धमकीचा ई-मेल आला. या ई-मेलमध्ये आरडीएक्स (RDX) आणि आयईडी (IED) वापरून स्फोट घडवणार असल्याची धमकी देण्यात आली होती. तसेच, ‘तीन व्हीआयपी खोल्यांमधील आणि इतर पाहुण्यांना बाहेर काढा,’ असा उल्लेखही करण्यात आला होता. या ई-मेलमध्ये तामिळनाडू पोलिसांना कामगार संघटना स्थापन करण्याची परवानगी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याच घटनेशी संबंधित दुसरा एक प्रकार गुरुवारी घडला. सायंकाळी 5.30 च्या सुमारास पोलीस महासंचालकांच्या नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. मुंबई लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असून स्फोट घडवणार असल्याची माहिती त्याने दिली.
या दोन्ही घटनांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-मेल पाठवण्यासाठी ‘आउटलूक’ ईमेल आयडीचा वापर करण्यात आला आहे. ई-मेलमधील मजकूर पाहता हा एक खोडसाळपणा असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, तरीही पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे आणि ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.


