
Mumbai BMC Latest News : महापालिकेकडून सापत्न वागणुकीमुळे आरोग्यसेविका आक्रमक; 3 हजारांहून अधिक महिलांचा एकमुखी निर्णय
मुंबई :- एकीकडे मुंबईत डेंग्यू आणि हिवतापाच्या साथीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असताना, दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्यसेविकामुळे शहर आरोग्यसेवेचा कणाच कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करून, आगामी महानगरपालिका निवडणुकीचे काम सोपवल्याने तब्बल तीन हजारांहून अधिक आरोग्य स्वयंसेविकांनी हे काम करण्यास नकार दिला आहे. Mumbai BMC Latest News
आरोग्य स्वयंसेविका मुंबईच्या वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन आरोग्य जनजागृतीचे महत्त्वाचे काम करतात. गरोदर माता, लहान बालके आणि क्षयरुग्णांची काळजी घेण्यापासून ते कुटुंब नियोजनापर्यंतची अनेक महत्त्वाची कामे त्यांच्यावर सोपवण्यात आली आहेत. सध्याच्या डेंग्यू आणि हिवतापाच्या साथीच्या काळातही त्या डासांची उत्पत्तीस्थाने शोधून जनजागृती करत आहेत. अशा वेळी प्रशासनाने त्यांच्यावर निवडणुकीचे काम लादल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.
विशेष म्हणजे, कामगार न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने या आरोग्यसेविकांना पालिकेच्या सेवेत कायम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाने हा निर्णय मानण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आरोग्यसेविकांमध्ये मोठा संताप आहे. महापालिका त्यांना केवळ १४ हजार रुपये मासिक मानधन देते, तर दुसरीकडे कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करूनही त्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणतेही लाभ मिळत नाहीत. या दुजाभावामुळेच संतप्त झालेल्या आरोग्य स्वयंसेविकांनी निवडणुकीचे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महापालिकेसमोरील अडचणी वाढल्या आहेत.


