Nalasopra News : नालासोपाऱ्यात पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 109 नायजेरियन नागरिक ताब्यात; बेकायदेशीर वास्तव्य आणि अवैध धंद्यांवर मोठी कारवाई

Nalasopra Latest Crime News : पोलीस आणि महापालिकेची संयुक्त मोहीम; 40 विनापरवाना दुकाने सील, पासपोर्ट-व्हिसाची कसून तपासणी सुरू
नालासोपारा | वसई-विरार परिसरात गेल्या काही काळापासून वाढलेली नायजेरियन नागरिकांची दहशत आणि त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांविरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे. नालासोपारा पूर्व परिसरात बुधवारी पहाटेपासून पोलीस प्रशासन आणि महापालिकेने संयुक्त ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. या धडक कारवाईत आतापर्यंत १०९ विदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचे पासपोर्ट आणि व्हिसा तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अमली पदार्थ आणि दादागिरीला बसणार लगाम
नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर आणि अगरवाल नगर या भागांमध्ये नायजेरियन नागरिकांची मोठी वस्ती आहे. यातील अनेक नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असून, त्यांच्याकडून रात्रीच्या वेळी अमली पदार्थांची विक्री आणि इतर अवैध प्रकार केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या नागरिकांच्या दादागिरीमुळे स्थानिक रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोठी धरपकड सुरू केली असून, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या घरांची कसून झडती घेतली जात आहे.
40 दुकाने सील, इमारतींवरील कब्जा हटवणार
केवळ वास्तव्यच नाही, तर अनेक नायजेरियन नागरिकांनी गुमास्ता परवान्याशिवाय नालासोपाऱ्यात व्यवसाय थाटले होते. महापालिका प्रशासनाने कारवाईदरम्यान अशा 40 दुकानांवर टाच आणली आहे. काही इमारतींमध्ये बेकायदेशीरपणे कब्जा मिळवून राहणाऱ्यांचीही माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे नाहीत, अशांना मायदेशी परत पाठवण्याची (डिपोर्ट) प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
पोलिसांचा इशारा: कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य
या कारवाईबाबत अधिक माहिती देताना पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी म्हणाल्या की, “नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आम्ही ही संयुक्त कारवाई करत आहोत. आतापर्यंत 109 विदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात असून, ज्यांच्याकडे व्हिसा किंवा पासपोर्ट नाही, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. बेकायदेशीर व्यवसाय आणि वास्तव्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.”


