महाराष्ट्र

Mumbai BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत उद्या! मनसेची सव्वाशे जागांवर दावा करण्याची तयारी

Thackeray MNS Yuti : ठाकरे गटासोबत युतीआधी ‘मेरीट’नुसार जागावाटपाची रणनिती; दादर, परळ, भांडुपसारख्या मराठी पट्ट्यात मनसेची ताकद

मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीची (BMC Elections) तयारी करणाऱ्या उमेदवारांची प्रतीक्षा आता संपणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी प्रभाग आरक्षण सोडत उद्या, 11 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार चाचपणी सुरू केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) देखील आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

मनसेचा ‘सव्वाशे’ जागांचा दावा

शिवसेना (ठाकरे गट) सोबत संभाव्य युती होण्याआधीच मनसेने मुंबई महापालिकेच्या सर्व 227 जागांचा सविस्तर आढावा घेतला आहे. मनसेच्या मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आढावा बैठकांमध्ये मुंबईतील सव्वाशे (125) जागांवर पक्षाची ताकद असल्याचा आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास चांगले उमेदवार तयार असल्याचा अंदाज समोर आला आहे. मनसेने तयार केलेल्या यादीत माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, जोगेश्वरी यांसारख्या मराठी मतदार मोठ्या संख्येने असलेल्या जागांचा समावेश आहे.

जागावाटपाचे सूत्र

जागावाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून जवळपास सव्वाशे जागांची यादी तयार करण्यात आली आहे. युती झाल्यास हे जागावाटप कुठल्याही निश्चित सूत्रावर नव्हे, तर ‘मेरीट’नुसार म्हणजेच ज्या पक्षाची ज्या जागेवर अधिक ताकद आहे, त्यानुसार होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 11 नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ठाकरे गट आणि मनसेमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यासाठीचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षणाची सोडत आणि निकाल जाहीर होईल. यानंतर, 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना मागवण्यात येतील. हरकती व सूचनांवर विचार करून 21 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आयुक्तांकडून निर्णय घेतला जाईल आणि 28 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम आरक्षण जाहीर केले जाईल.

vivek

Recent Posts