
Mumbai Latest Political News : प्रभाग 157 मधून भाजपच्या उमेदवाराचा केला होता पराभव; ठाकरे गटाकडून अपात्रतेच्या कारवाईची तयारी; नगरसेवकांची संख्या 64 वर येण्याची शक्यता
मुंबई l कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटाचे नगरसेवक फुटल्यानंतर आता मुंबईतही खिंडार पडल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक 157 मधून शिवसेना (UBT) कडून निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी शिवसेना भवनात बोलावण्यात आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या महत्त्वाच्या बैठकीला त्या गैरहजर राहिल्या. इतकेच नव्हे तर, सर्व नगरसेवक जेव्हा गट नोंदणीसाठी नवी मुंबईला रवाना झाले, तेव्हाही त्या सहभागी झाल्या नाहीत, ज्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
अपात्रतेची टांगती तलवार डॉ. सरिता म्हस्के यांनी प्रभाग 157 मध्ये भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव करून विजय मिळवला होता. मात्र, निकालानंतर अवघ्या पाच दिवसांत त्यांनी शिंदे गटात जाण्याचे संकेत दिल्याने ठाकरे गटाने आक्रमक पाऊल उचलले आहे. जर त्यांनी पक्षादेश झुगारून शिंदे गटाला साथ दिली, तर त्यांच्यावर त्वरित अपात्रतेची कारवाई करण्याची प्रक्रिया ठाकरे गटाने सुरू केली आहे. यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ 65 वरून 64 वर येण्याची शक्यता आहे.
किशोरी पेडणेकर गटनेतेपदी दरम्यान, अशा कोणत्याही गळतीला रोखण्यासाठी आणि महापालिकेत आक्रमकपणे बाजू मांडण्यासाठी ठाकरे गटाने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड केली आहे. पेडणेकर यांच्या निवडीवर आज झालेल्या बैठकीत अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.



