
Ajit Pawar Latest News: वादग्रस्त वक्तव्यांची किंमत मोजावी लागली; रुपाली चाकणकरांवर टीका भोवली; सूरज चव्हाण यांची पुन्हा नियुक्ती
मुंबई :- वादग्रस्त वक्तव्ये करून पक्षाची आणि महायुतीची सातत्याने कोंडी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांना मोठा झटका बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी Amol Mitkari आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांची अखेर प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये वारंवार तणाव निर्माण होत होता. त्यांच्या अनेक राजकीय विधानांवरून भाजप आणि शिंदे गटाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. तर, रुपाली ठोंबरे-पाटील यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणावरून आपल्याच पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट भाषेत टीका केली होती. यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. रुपाली ठोंबरे-पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर काही तासांतच त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
या दोघांव्यतिरिक्त वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांना देखील प्रवक्ते पदावरून हटवण्यात आले आहे. तर, दुसरीकडे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे मध्यंतरी पायउतार व्हावे लागलेल्या सुरज चव्हाण यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा मोठा बदल करण्यात आला आहे. आता या कारवाईवर अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून नव्याने प्रवक्ते नियुक्त?
1.अनिल पाटील
2.रुपाली चाकणकर
3.ब्रिजमोहन श्रीवास्तव
4.चेतन तुपे
5.आनंद परांजपे
6.अविनाश आदिक
7.सना मलिक
8.राजलक्ष्मी भोसले
9.सुरज चव्हाण
10.हेमलता पाटील
11.प्रतिभा शिंदे
12.विकास पासलकर
13.राजीव साबळे
14.प्रशांत पवार
15.श्याम सनेर
16.सायली दळवी
17.शशिकांत तरंगे



