मुंबई

Mumbai Banganga Maha Arati : मुंबईच्या बाणगंगा महाआरतीचा मार्ग मोकळा; त्रिपुरारी पौर्णिमेला 7 नोव्हेंबर रोजी होणार भव्य आयोजन

Mumbai Banganga Maha Arati Latest News : वाहतूक कोंडीमुळे पोलिसांनी नाकारली होती परवानगी; मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्तक्षेपानंतर मिळाली मंजुरी

मुंबई :- वाराणसीच्या प्रसिद्ध गंगा आरतीच्या धर्तीवर मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावाच्या काठावर यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 7 नोव्हेंबर रोजी महाआरती होणार आहे. दक्षिण मुंबईत वाहतूक नियंत्रणाच्या अडचणीमुळे सुरुवातीला पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती, मात्र स्थानिक आमदार तथा मंत्री मंगलप्रभात लोढा Mangal Prabhat Lodha यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलीस प्रशासनाने अखेर परवानगी दिली आहे.

परवानगी नाकारण्याचे कारण

दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाला धार्मिक, पर्यटन आणि पुरातन वास्तू म्हणून मोठे महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांपासून त्रिपुरारी पौर्णिमेला या तलावाच्या काठावर हजारो दिवे लावून भव्य महाआरती केली जाते. यंदा मात्र वाहतूक पोलिसांनी गर्दी वाढेल, असे कारण देत 3 ऑक्टोबर रोजी जीएसबी ट्रस्टला परवानगी नाकारली होती. या महाआरतीसाठी मुंबईसह राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात.

लोढा यांच्या मध्यस्थीनंतर तिढा सुटला

परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीत लोढा यांनी जनतेच्या भावनांचा आदर करून प्रशासनाने आरती कार्यक्रमात आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या संख्येने जमा होत असले तरी प्रशासनाने जनतेच्या भावनांचा अनादर करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे, बाणगंगा ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आणि स्थानिक रहिवासी यांच्या बैठकीनंतर महाआरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

बाणगंगा तलावाचे महत्त्व

बाणगंगा तलावावरील ही महाआरती वर्षातून एकदाच होते. हजारो दिव्यांनी उजळणारी ही महाआरती वाराणसीच्या गंगा आरतीसारखीच भव्य आणि आकर्षक असते. बाणगंगा तलावाची उत्पत्ती थेट रामायण काळाशी जोडलेली असून, प्रभू श्रीराम यांनी या परिसरात बाण मारून गोड्या पाण्याचा झरा निर्माण केला, अशी दंतकथा आहे.

तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, बजरंग आखाडा आणि वाळकेश्वर मंदिर यांसारखी प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत. या परिसराची देखभाल गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टतर्फे केली जाते.

vivek

Recent Posts