Maharashtra News : ‘काम बंद’चा इशारा, पण रुग्णसेवा सुरळीत! – 30 हजार परिचारिकांच्या आंदोलनात प्रशासनाची यशस्वी तारेवरची कसरत

Maharashtra Latest News : सरकारी रुग्णालयांतील रिक्त पदे भरण्यासाठी आंदोलन; कंत्राटी भरतीला विरोध करत परिचारिकांचा आझाद मैदानात एल्गार!
मुंबई :- राज्यभरातील 30 हजार परिचारिकांनी गुरुवारी ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्याने एकच खळबळ उडाली. सरकारी रुग्णालयांतील रिक्त पदे तातडीने भरणे, कंत्राटी भरती टाळणे या प्रमुख मागण्यांसाठी मुंबईतील जे.जे., सेंट जॉर्जेस, जी.टी. आणि कामा रुग्णालयांतील परिचारिका ‘काम बंद’ आंदोलनात सहभागी झाल्या.
पण परिचारिकांच्या अनुपस्थितीतही रुग्ण सेवा कोलमडली नाही, याचे श्रेय जाते प्रशासनाच्या तातडीच्या कृतीला. शिकाऊ परिचारिकांनाही रुग्ण कक्ष व शस्त्रक्रियागृहांमध्ये जबाबदारी देण्यात आली, तसेच वरिष्ठ परिचारिकांची पूर्तता करून रचना सांभाळण्यात आली. त्यामुळे फक्त काही किरकोळ शस्त्रक्रिया वगळता, उपचारांवर फारसा परिणाम झाला नाही.
जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले, “शिकाऊ परिचारिकांनी जबाबदारीने काम हाताळले. काही सामाजिक संस्थांचीही मदत घेतली. त्यामुळे सेवा सुरळीत राहिली.”
सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी मात्र कबूल केले की, “परिचारिकांच्या अनुपस्थितीमुळे तीन शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या.”
जी.टी. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र संकपाळ म्हणाले, “आम्ही बुधवारीच नियोजन करून तिन्ही पाळ्यांमध्ये शिकाऊ परिचारिका नियुक्त केल्या. गुरुवारसारखेच नियोजन सुरू ठेवू.”


