क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai- Ahmedabad highway  : वाहतूक कोंडीत चिमुकल्याच्या मृत्यूनंतर मनसे आक्रमक, खानिवडे टोल नाक्यावर तीव्र आंदोलन

Mumbai- Ahmedabad highway : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी जीवघेणी; ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

वसई :- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या वाहतूक कोंडीचा बळी ठरलेल्या 16 महिन्यांच्या चिमुकल्याच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शनिवारी खानिवडे टोल नाका येथे तीव्र आंदोलन केले.

वाहतूक कोंडी ठरली जीवघेणी

वसई पूर्वेच्या भागातून जाणाऱ्या या महामार्गावर पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. गुरुवारी (19 सप्टेंबर) या वाहतूक कोंडीमुळे एका रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला आणि त्यात अडकून रियान शेख या 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मनसेचे आक्रमक आंदोलन

या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी दुपारी 12 वाजता मनसे कार्यकर्त्यांनी विरार-खानिवडे टोल नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले. मनसेचे शहर प्रमुख प्रवीण भोईर यांनी या घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल केला. “ज्यांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडल्या आहेत, त्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत,” अशी मागणी मनसेने केली आहे.

आंदोलकांनी ‘आधी रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करा, मगच टोल नाका सुरू करा’ अशा जोरदार घोषणा देत काही काळ टोल नाका बंद पाडला होता. या आंदोलनामुळे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी येत्या सात दिवसांत खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले आहे. वर्सोवा ते विरार फाटा दरम्यानची सततची वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात आता जीवघेणे ठरत असून, प्रशासनाच्या उदासीनतेवर मनसेने बोट ठेवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0