Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; ‘तो’ क्षण पाहण्यासाठी भक्तांचा महासागर लोटला

• ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने लालबाग परिसर दुमदुमला, विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
मुंबई :- गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा आज (शनिवार) शेवटचा दिवस आहे. याच दिवसाची आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो क्षण अखेर आला आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये अग्रगण्य असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. राजा मंडपातून बाहेर येताच भाविकांचा एकच जल्लोष सुरू झाला.
सकाळपासूनच लालबाग परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात आणि ढोल-ताशांच्या निनादात लालबागचा राजा मंडपातून बाहेर आला. हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
राजा मंडपातून बाहेर येताच भक्तांच्या डोळ्यांत भावनिक अश्रू तर ओठांवर बाप्पाचा जयघोष होता. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तीचा महासागर या सगळ्यांमध्ये बाप्पाचा निरोप घेतला जात आहे. मिरवणुकीत राजाचा मनमोहक देखावा अधिकच खुलून दिसत आहे.



