Mumbai Accident News : छठ पूजेहून परतणाऱ्या तरुणाला बसची धडक; जेव्हीएलआरवर भीषण अपघात, दुचाकीस्वार राहुल विश्वकर्माचा जागीच मृत्यू

Mumbai Latest Bus Driver Accident News : बहिणीला घेऊन घरी परतत होता; अपघातानंतर बसचालक फरार, पवई पोलीस शोध घेत आहेत
मुंबई :- जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावर (JVLR) सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. छठ पूजेहून बहिणीला घेऊन दुचाकीवरून परतणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण राहुल विश्वकर्मा (वय 25) याचा मृत्यू झाला, तर मागे बसलेली त्याची बहीण जखमी झाली. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पळून गेला असून, पवई पोलीस Powai Police त्याचा कसून शोध घेत आहेत. Mumbai Latest Accident News
विक्रोळी पूर्वेकडील रहिवासी असलेला राहुल विश्वकर्मा एका खासगी कुरियर कंपनीत काम करत होता. सोमवारी संध्याकाळी त्याचे कुटुंबिय मालाड येथे छठ पूजेसाठी गेले होते. राहुल दिवसभराचे काम संपवून सायंकाळी मालाड येथे पूजेसाठी गेला होता.
रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या बहिणीला घेऊन दुचाकीवरून घरी परतत असताना जोगेश्वरी विक्रोळी जोड रस्त्यावरून (जेव्हीएलआर) जात होता. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका बसने राहुलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे राहुल आणि त्याची बहीण दुचाकीवरून खाली पडले. राहुल दुर्दैवाने बसच्या पुढील चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला.
बसचालकाने अपघात घडल्यानंतर जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून लगेच पळ काढला. जखमी राहुलला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला.
मयत राहुलच्या बहिणीने प्रसंगावधान राखून पळून जाणाऱ्या बसचालकाचा क्रमांक टिपून घेतला होता. पवई पोलिसांनी बसचालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.


