Maharashtra Political Update : बोगस मतदारांवरून राजकीय भूकंप! विरोधकांचा 1 नोव्हेंबरला मुंबईत महामोर्चा

Maharashtra Political Latest Update : निवडणूक आयोगाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त; शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करणार मोर्चाचे नेतृत्व
मुंबई :- राज्यात बोगस आणि दुबार मतदारांचा मुद्दा पेटला असताना, यासंदर्भात राज्य निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या भेटीनंतरही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या निषेधार्थ विरोधी पक्षांनी येत्या 1 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी दिली.
नेत्यांचे आवाहन
‘शिवसेना भवन’ येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जयंत पाटील, काँग्रेसचे सचिन सावंत आणि मनसेचे बाळा नांदगावकर उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे दुबार मतदार वगळण्यासाठी कोणता कार्यक्रम हाती घेणार आणि ज्यांचे पत्ते नाहीत त्या मतदारांचे काय करणार, याचा खुलासा करण्याची मागणी केली. “आयोग अनेक गोष्टी दडवून ठेवत आहे,” असे म्हणत त्यांनी लोकशाहीवर आस्था असलेल्या सर्वांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. सचिन सावंत यांनी काँग्रेस कार्यकर्ते पूर्ण ताकदीने मोर्चात सहभागी होतील, असे स्पष्ट केले.
मोर्चाचे नेतृत्व
या महामोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्रातील दिग्गज नेते करणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाविकास आघाडीतील (मविआ) इतर प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.
बोगस मतदारांमुळे लोकशाही धोक्यात येत असल्याचा आरोप करत, आयोगाच्या भूमिकेविरोधात विरोधकांनी एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा हा निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.


