
MNS Avinash jadhav On gunratna sadavarte : राज ठाकरे यांच्या मोर्चाला विरोध करताच, अविनाश जाधव भडकले — “तोंडाला पट्टी बांधा!”
मुंबई | महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या मोर्चाला विरोध केल्यानंतर वाद पेटला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आक्षेपाला उत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट आणि आक्रमक शब्दांत प्रतिउत्तर दिलं.
“सदावर्ते हा भाजपचा पाळलेला माणूस आहे. तो जिथे तिथे उगाच उडी मारतो. सिद्धिविनायक मंदिरातही त्याने डोके खुपसले. एवढी अक्कल आहे तर जा ना साऊथमध्ये हिंदीच्या विरोधात बोलायला! तिकडे बघू तुला किती ज्ञान कामी येतं,” असा संतप्त घणाघात करत अविनाश जाधवांनी थेट धमकीवजा इशारा दिला की, ‘एक दिवस मराठी जनता त्याला चोपेल!’
सदावर्ते यांनी मोर्चाला परवानगी नसल्याचा दावा करत, राज ठाकरे भाषिक वाद निर्माण करत आहेत, असं म्हणत पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं, अशी मागणी केली. यावरून मनसैनिक आक्रमक झाले असून, याला तोंडाची पट्टीच लावायला हवी, असं थेट वक्तव्य जाधव यांनी केलं आहे.
मराठी भाषेच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त करताना जाधव म्हणाले, “माझा मुलगा चौथीत आहे, तो मराठीहून अधिक हिंदी मिसळून बोलतो. मेंदूवर याचा विपरित परिणाम होतोय. शिक्षणात सक्तीने हिंदी आणली जात असेल, तर हे ‘दिल्ली मनसुबे’ आमचं महाराष्ट्र संपवण्याचा डाव आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
“मोर्चा ही केवळ आमची पहिली पायरी आहे. यापुढे विरोध आणखी तीव्र होईल. आम्ही ज्या पक्षांसोबत आहोत, ते सर्व मिळून या निर्णयाला रोखतील. सरकारने अजूनही वेळ आहे, सावध व्हावं. नाहीतर जनतेच्या रागाला तोंड द्यावं लागेल,” असा स्पष्ट इशारा मनसेने दिला आहे.


