
Nanded former MLA Shankar dhondge join shivsena : कार्यकर्त्यांच्या बळावर शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष; धोंडगे यांच्या प्रवेशाने नांदेडमध्ये पक्षाची ताकद वाढली
मुंबई | राज्यातील प्रमुख निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता राजकीय पुनर्रचनेला वेग आला असून, नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा करत, योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वस्त केले आहे. Nanded former MLA Shankar dhondge join shivsena
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शंकर धोंडगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. आम्ही अनेक राजकीय प्रवाह पाहिले आहेत, मात्र कार्यकर्त्यांची कदर करणारा आणि दिलदार मनाचा एकमेव नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत, असे ते म्हणाले. या विश्वासाच्या जोरावरच आपण शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी धोंडगे यांचे पक्षात स्वागत केले आणि शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेणारा पक्ष असल्याचे नमूद केले. या पक्षात कोणीही मालक किंवा चालक नाही, तर कष्ट करणारा सामान्य कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा पाठीचा कणा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या हालचाली गतीमान झाल्याची माहिती दिली. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आधीच ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जात असून, अतिवृष्टीसाठी 32 हजार कोटींचे वाटप करण्यात आले आहे. कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात आली असून, योग्य वेळी सरकार ऐतिहासिक निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. सध्या राज्यातील बँकांकडून थकीत कर्जदारांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, पोर्टलवर मोठ्या प्रमाणावर डेटा अपलोड केला जात आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयाला आली आहे, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. महायुतीला जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आभार मानले आणि शेतकरी सुखी झाल्याशिवाय राज्याची प्रगती शक्य नसल्याची भूमिका मांडली. नांदेडमधील धोंडगे यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यात शिवसेनेची ताकद वाढली असून, आगामी काळात संभाजीनगरमधील इतर पक्षांचे पदाधिकारीही शिवसेनेत येतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत.



