MLA Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी

•Sangram Jagtap Death Threat ‘‘संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा’’ स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज
अहिल्यानगर | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. ही धमकी त्यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर संदेशाद्वारे देण्यात आली असून, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार संग्राम जगताप हे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर मिळालेली ही धमकी गंभीर मानली जात आहे.
स्वीय सहायक सुहास शिरसाठ (वय 37, रा. बुरुडगाव रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी 3 वाजता बाजार समिती चौकात असताना एका अनोळखी क्रमांकावरून त्यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज आला. या मेसेजमध्ये “संग्राम को दो दिन के अंदर खत्म करुंगा” असा मजकूर होता, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
धमकीचा मेसेज आल्यापासून आमदार जगताप यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून, सहायक फौजदार अमिना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. संबंधित मोबाईल क्रमांकाचा तपास आणि संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन शोधण्याचे काम सुरू आहे.


