मुंबई

MLA Prasad Lad : राजकारण बाजूला, नाते जपले! भाजप आमदार प्रसाद लाड ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरेंना दिले मुलाच्या लग्नाचे निमंत्रण

MLA Prasad Lad Meet Uddhav Thackeray : पुत्र शुभमच्या विवाह सोहळ्यासाठी लाड कुटुंबाची विशेष भेट | राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकदार संघर्ष पाहायला मिळत असतानाच, वैयक्तिक स्नेहाचा एक वेगळा पैलू समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड MLA Prasad Lad यांनी आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. निमित्त होते प्रसाद लाड यांचे चिरंजीव शुभम लाड यांच्या विवाह सोहळ्याचे. या मंगल कार्याचे निमंत्रण देण्यासाठी लाड यांनी सहकुटुंब ठाकरेंची भेट घेतली.

राजकीय कटुता विसरून कौटुंबिक स्नेह

गेल्या काही काळापासून भाजप आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यात प्रचंड राजकीय संघर्ष सुरू आहे. अनेक मुद्द्यांवरून प्रसाद लाड आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर तुटून पडताना दिसतात. मात्र, मुलाच्या लग्नासारख्या शुभ कार प्रसंगी राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुमारे अर्धा तास चाललेल्या या भेटीत केवळ घरगुती आणि लग्नाच्या विषयावरच चर्चा झाल्याचे समजते.

नेत्यांच्या गाठीभेटींचा सिलसिला
प्रसाद लाड यांनी केवळ उद्धव ठाकरेच नव्हे, तर राजकारणातील इतर प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. शुभम लाड यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार असून, या सोहळ्याला राज्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

“राजकारण आपल्या जागी असते, पण सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात एकमेकांशी असलेले संबंध जपले पाहिजेत. मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ही सदिच्छा भेट होती.”
— (प्रसाद लाड यांचे निकटवर्तीय)

या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, “राजकारण कितीही तापलेले असले तरी महाराष्ट्राची ही सुसंस्कृत राजकीय परंपरा आहे,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहेत.

vivek

Recent Posts