
MLA Ashok Jadhav Joined Thackeray Group : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला गळती; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले ‘शिवबंधन’
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2026) मतदान अवघ्या काही दिवसांवर आले असताना, मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विलेपार्लेचे माजी आमदार अशोक जाधव यांचे चिरंजीव कुणाल जाधव यांनी आज आपल्या समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुणाल जाधव यांचे स्वागत करून त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले.


पक्षांतराचा सिलसिला सुरूच
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षांतराचे सत्र थांबेल, अशी राजकीय वर्तुळात अपेक्षा होती. मात्र, 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वीच अनेक बडे नेते आपली राजकीय सोय पाहत दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवानंतर काँग्रेस आणि शरद पवार गटातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातच आता कुणाल जाधव यांच्या रूपाने विलेपार्ले आणि परिसरात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.
जाधवांच्या प्रवेशाने ठाकरे गटाची ताकद वाढणार
अशोक जाधव यांनी विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून, या भागात त्यांचे मोठे जनवलय आहे. कुणाल जाधव यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे विलेपार्ले, अंधेरी आणि आजूबाजूच्या प्रभागांमध्ये शिवसेना (ठाकरे) ची ताकद वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः स्थानिक स्तरावरील तरुण कार्यकर्त्यांचे जाळे कुणाल जाधव यांच्यासोबत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस?
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 232 जागा जिंकत बाजी मारली. या निकालानंतर महाविकास आघाडीत, विशेषतः काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. मित्रपक्षांमध्येच (काँग्रेस ते शिवसेना ठाकरे) होत असलेल्या या पक्षांतरामुळे आघाडीतील अंतर्गत समन्वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


