Mira Road Online Scam : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : सायबर पोलिसांकडून 5 लाखांहून अधिक रक्कम परत!

•मीरा-भाईंदर सायबर पोलिसांचे यश; सात महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर तक्रारदाराला मिळाला दिलासा
मीरा रोड :– ऑनलाईन शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झालेल्या एका तक्रारदाराला सायबर पोलीस ठाण्याच्या अथक प्रयत्नांमुळे 5 लाख 16 हजार 821 रुपये परत मिळाले आहेत. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांनी गेल्या सात महिन्यांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि न्यायालयाच्या आदेशामुळे ही रक्कम परत मिळवणे शक्य झाले आहे.
नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिला रहिवासी असलेल्या रोशनी रोशनी यांना सोशल मीडियाद्वारे ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याबाबतची जाहिरात मिळाली होती. जाहिरातीतील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात रकमेची गुंतवणूक केली. मात्र, जेव्हा त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम ॲपमधून काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ती काढता येत नसल्याचे लक्षात आले आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांना कळून चुकले.

रोशनी यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला. सायबर पोलिसांनी तात्काळ याची नोंद घेऊन NCCRP पोर्टल वर देखील तक्रार नोंदवली. ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवल्याने, फसवणुकीची वर्ग झालेली रक्कम संशयीत बँक खात्यात तात्काळ थांबवण्यात आली. तक्रारदाराला त्यांची रक्कम परत मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
रोशनी यांनी आपली फसवणुकीची रक्कम परत मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका सादर केली. सायबर पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला आणि न्यायालयाचे आदेश प्राप्त केले.
अशाप्रकारे, सायबर पोलीस ठाण्याने मागील सात महिन्यांपासून चौकशी करत तसेच न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून तक्रारदाराची फसवणूक झालेली 5 लाख 16 हजार 821 रुपये रक्कम त्यांच्या मूळ खात्यात परत मिळवून दिली. रक्कम परत मिळाल्यानंतर, तक्रारदाराला प्रतिकात्मक धनादेश देऊन माहिती देण्यात आली.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सपोनि स्वप्नील याव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर, पोलीस उपनिरीक्षक वैभव धनवडे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, पोअं विलास खाटीक आणि राजेश भरकडे (सर्व नेम सायबर पोलीस ठाणे) यांनी पार पाडली आहे.


