Mira Road Crime News : सोन्याच्या चेनसाठी वृद्धाचा खून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न; आरोपी सलून चालक अटकेत

•मिसिंग व्यक्तीचा शोध सुरू असताना सीसीटीव्हीमुळे उकल; मृतदेह गटारात टाकल्याची आरोपीची कबुली
मीरा रोड :– सोन्याची चेन लुबाडण्याच्या उद्देशाने एका 75 वर्षीय वृद्धाचा खून करून मृतदेह गटारात फेकून पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार मीरा रोडमध्ये उघडकीस आला आहे. काशिमीरा पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सलून चालकाला अटक केली आहे.
16 सप्टेंबर 2025 रोजी विठ्ठल बाबुराव तांबे (वय 75) हे हरवल्याची तक्रार त्यांचा मुलगा समीर तांबे यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांचे पथक हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना, त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये विठ्ठल तांबे हे एका सलूनमध्ये प्रवेश करताना दिसले. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी पहाटेच्या दरम्यान आरोपी सलूनमधून मृतदेह फरफटत नेत असल्याचेही दिसून आले.
कौशल्यपूर्ण तपासाने आरोपीला बेड्या
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सलून चालक अशफाक इशाक शेख (वय 39) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने सांगितले की, विठ्ठल तांबे हे त्यांच्या सलूनमध्ये आले होते. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन पाहून त्याने त्यांना थांबवून घेतले. सलूनमध्ये कोणीही ग्राहक नसल्याचे पाहून, त्याने टॉवेलने त्यांचे तोंड दाबून गळा आवळला आणि त्यांना ठार मारले. त्यानंतर त्याने त्यांची सोन्याची चेन काढून घेतली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मध्यरात्री मृतदेह जवळच्या गटारात फेकून दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अशफाक शेख याला अटक केली असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103,238,309,(6) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शितल मुंडे करत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.



