Mira Road Crime News : फसव्या सिमकार्डचे जाळं उद्ध्वस्त! — परस्पर केवायसीवर सिम विकणारा गँगचा ‘काळा धंदा’ उघड

•खंडणी विरोधी पथकाची गुप्त तपास मोहीम यशस्वी; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
मिरा रोड | देशभरात वाढत्या सायबर गुन्हेगारी, ड्रग्स व्यवहार आणि दहशतवादी कारवायांमध्ये बनावट केवायसीवर सिमकार्ड अॅक्टिव्हेट करून त्याचा दुरुपयोग केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत सायबर फसवणुकीचं मोठं जाळं उद्ध्वस्त केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जून 2025 रोजी खंडणी विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे काशिमीरा परिसरात सापळा रचून रेहान अमीर खान (वय 40) याला अटक केली. त्याच्याकडून विविध कंपन्यांची 42 सक्रिय सिमकार्ड, 11 मोबाईल फोन्स आणि 1.40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या सिमकार्ड्सचा वापर सायबर गुन्हे आणि इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी होणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
रेहान खान याने चौकशीत अनुज साळवी या इसमाकडून केवायसीद्वारे फसवून आणलेली सिमकार्ड्स खरेदी केली होती. अनुज साळवी लोकांकडून त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून एकाऐवजी अधिक सिमकार्ड अॅक्टिव्हेट करून विक्री करत होता, हे उघडकीस आले आहे. याच सिमकार्ड्सचा वापर रेहान खान त्याच्या संपर्कातील लोकांना जास्त किंमतीत विक्री करत असल्याची कबुली दिली आहे.
या प्रकारामुळे खऱ्या सिमधारकांनाही आपल्यावर संशय येण्याचा धोका निर्माण होत होता आणि अनेक गुन्ह्यांचे मूळ आरोपी शोधणे कठीण होत होते. त्यामुळे ही कारवाई सायबर गुन्हेगारीला रोखण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
या प्रकारामुळे खऱ्या सिमधारकांनाही आपल्यावर संशय येण्याचा धोका निर्माण होत होता आणि अनेक गुन्ह्यांचे मूळ आरोपी शोधणे कठीण होत होते. त्यामुळे ही कारवाई सायबर गुन्हेगारीला रोखण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात कलम 316(2), 318(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून रेहान खानस ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक आयुक्त मदन बल्लाळ, तसेच प्रभारी निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयेंद्र आंबवडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओंकार कोवे, पोलीस उपनिरीक्षक शकील पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजवीर संधू, पोलीस हवालदार सतिष जगताप, शरद पाटील, अनिल नागरे, अकिल सुतार, साकेत माघाडे, तसेच संतोष चव्हाण (सायबर पोलीस ठाणे) या पथकाने ही कारवाई केली आहे.



