Mira Road Crime News : दरोड्याच्या तयारीत असलेल्या 7 रेकॉर्डवरील गुंडांना अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

Mira Road Latest Crime News : देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसांसह दोन कार जप्त; मीरा रोड येथील सनशाईन हॉटेलजवळ सापळा
मीरा रोड :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करून मोठी कारवाई केली आहे. या आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतुसे आणि इतर घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे मीरा रोड परिसरातील एका मोठ्या गुन्ह्याचा डाव उधळला गेला आहे. Mira Road Latest Crime News


सोमवारी, 4 ऑगस्ट रोजी रात्री 7.15 वाजता खंडणी विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, पेणकरपाडा येथील सनशाईन हॉटेलजवळ काही इसम दरोड्याच्या उद्देशाने घातक हत्यारांसह एकत्र येणार आहेत. ही माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी राहुल राख यांनी तात्काळ दोन पथके तयार करून सापळा रचण्याचे आदेश दिले.
रात्रीच्या सुमारास दोन संशयित कार (एक निळ्या रंगाची मारुती स्विफ्ट आणि एक काळ्या रंगाची महिंद्रा थार) घटनास्थळी आल्या. पोलिसांनी त्यांना बाहेर येण्याचा इशारा देताच महिंद्रा थारचा चालक वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून गाडी थांबवली आणि त्यात असलेल्या तीन आरोपींना ताब्यात घेतले. याच झटापटीत थार कारची काच फुटली. दुसऱ्या मारुती स्विफ्ट कारमधील चार आरोपींनाही पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले.
पिस्टल, काडतुसे आणि इतर साहित्य जप्त
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सातही आरोपींची पंचांसमक्ष अंगझडती घेतली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह, आठ जिवंत काडतुसे, दोन फाईटर पंच, दोन सुती रस्सी आणि आठ मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी घातक शस्त्रांसह दरोडा टाकण्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रोहित वनकार, प्रतिक भोईर, निरज वेखंडे, समीर पालवी, भावेश गवाळे, अमर शिर्के आणि विजय चारघडे अशी आहेत. यातील अनेक आरोपींवर यापूर्वीही खून, हत्येचा प्रयत्न, दरोडा, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशीक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे, विजयेंद्र आंबवडे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.


