Manoj Jarange Patil : ‘आमच्या पोरांना पाणी मिळू देत नाही, तुमची सुट्टी होणार नाही!’

•मुंबईत आंदोलकांच्या जेवणा-पाण्याची गैरसोय, मनोज जरांगे पाटलांचा BMC आयुक्तांना
मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलकांनी मुंबईच्या आझाद मैदानात ठाण मांडले आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शेकडो आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या फलाटांवर झोपले होते. मात्र, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आंदोलकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः, परिसरातील अनेक सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्याची सोय नसल्याने आणि हॉटेल्स व खाऊगल्ल्या बंद ठेवल्यामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल झाले. यामुळे संतप्त झालेल्या मनोज जरांगे पाटलांनी थेट मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना इशारा दिला आहे.
आंदोलकांच्या संयमाची परीक्षा
आंदोलनास्थळी पोहोचल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचे आणि संयमाचे आवाहन केले. “आम्हाला राजकारण करायचे नाही, फक्त आरक्षण पाहिजे आहे. मुख्यमंत्र्यांना राजकारणच करायचे आहे, आरक्षण द्यायचे नाही,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईत दाखल झालेल्या मराठा बांधवांना त्यांनी आपली वाहने सरकारने दिलेल्या मैदानात सुरक्षित ठिकाणी लावण्याचे आवाहन केले. बीपीटी ग्राउंड, शिवडी आणि वाशी येथील मैदानांचा त्यांनी यासाठी उल्लेख केला.
“मुंबईत आलेल्या माझ्या मराठा बांधवांनी कोणताही गोंधळ घालू नये. ते काहीही वाईट करणार नाहीत, हा माझा शब्द आहे,” असे सांगत त्यांनी सर्वांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले.
मनोज जरांगे पाटलांचा थेट प्रशासनाला इशारा
आंदोलकांना जेवण आणि पाणी मिळत नसल्याने मनोज जरांगे पाटील संतप्त झाले. त्यांनी थेट बीएमसी आयुक्तांवर निशाणा साधला. “माझ्या पोरांना पाणी मिळू देत नाहीत. सध्या प्रशासक असल्यामुळे सगळा कंट्रोल मुख्यमंत्र्यांचा आहे. पण वेळ कधी ना कधी बदलेल,” असा इशारा त्यांनी दिला.
“तुम्ही सेवानिवृत्त जरी झालात तरी आयुक्त साहेब, तुम्हाला सुट्टी देणार नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचा पाणी बंद केलंय. चांगल्या चांगल्यांची जिरली आहे, तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना कधी बदल होत असतो, तेव्हा सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा. बीएमसीचा आयुक्त कोण आहे?” असे म्हणत त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.


