
Mira Bhayandar Crime News : इंग्लंडच्या नंबरचा वापर करून ओळख लपवण्याचा प्रयत्न फसला; गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-1 ची मोठी कारवाई
मिरा-भाईंदर | कर्नाटक राज्यातील एका बड्या व्यापाऱ्याला व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून मिरा-भाईंदरमध्ये बोलावणे, त्यांना हॉटेलमध्ये डांबून ठेवणे आणि पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2 कोटी 17 लाख रुपये लांबवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. काशिमिरा गुन्हे प्रकटीकरण शाखेने (कक्ष-1) अत्यंत कौशल्याने तपास करत या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अंकित बापू ठोंबरे याला नवी मुंबईतील शिळफाटा येथून अटक केली आहे.
गुंतवणुकीच्या नावाखाली सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या शिमोगा येथील 31 वर्षीय व्यापारी शमंतकुमार करडेर यांना आरोपी अंकितने 15 डिसेंबर 2025 रोजी फोन केला होता. तुमच्या कंपनीत मोठी गुंतवणूक करायची आहे, असे सांगून त्याने व्यापाऱ्याला काशिमिरा येथे बोलावून घेतले. शमंतकुमार मिरारोड येथे पोहोचल्यावर आरोपीने त्यांना आर. के. प्रिमियर हॉटेलमध्ये नेले.
पिस्तुलाचा धाक आणि इंटरनेट बँकिंगची लूट
15 ते 18 डिसेंबर या कालावधीत व्यापाऱ्याला हॉटेलच्या रूममध्ये डांबून ठेवण्यात आले. आरोपी अंकित आणि त्याच्या साथीदारांनी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून शमंतकुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून जबरदस्तीने अॅक्सिस बँकेच्या करंट खात्याचा नेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड मिळवला. यानंतर व्यापाऱ्याच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यातून एकूण 2 कोटी 17 लाख 63 हजार 287 रुपयांचे अनधिकृत व्यवहार करून रक्कम लांबवली.
तंत्रज्ञानाचा वापर करून ओळख लपवण्याचा बनाव आरोपी अत्यंत सराईत असून त्याने गुन्ह्यासाठी युनायटेड किंगडम (इंग्लंड) येथील इंटरनॅशनल नंबरचा वापर केला होता, जेणेकरून पोलिसांना आपली ओळख पटवता येऊ नये. मात्र, काशिमिरा गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून मुख्य आरोपी अंकित ठोंबरे (वय 40, रा. डोंबिवली) याला निष्पन्न केले. 6 जानेवारी 2026 रोजी पोलिसांनी शिळफाटा येथून त्याला ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीही जप्त केली आहे.
पोलीस पथकाचे यश
पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, योगेश काळे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या टोळीत आणखी किती जण सामील आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे इतर कोणाची फसवणूक केली आहे का, याचा अधिक तपास काशिमिरा पोलीस करत आहेत.


