Maharashtra Election : महाराष्ट्राचा ‘महाकौल’! 29 महापालिकांसाठी 3.5 कोटी मतदार ठरवणार शहरांचे भवितव्य; मुंबईत एका जागेसाठी तर पुण्यात चार मतांचा अधिकार

Maharashtra Election Latest News : पहिल्या दोन तासांत मालेगाव अव्वल; मुंबईत संथ सुरुवात, तर पुण्यात हाय-व्होल्टेज लढत!
मुंबई :- आज, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळपासून राज्यातील २९ महापालिकांच्या २,८६९ जागांसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुंबईत ‘ठाकरे बंधू’ विरुद्ध ‘महायुती’ असा थेट आणि प्रतिष्ठेचा सामना रंगला असताना, राज्याच्या इतर भागांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मतदारांमध्ये काहीसा तांत्रिक संभ्रम असला तरी लोकशाहीचा उत्साह दांडगा दिसत आहे.
मुंबईत ‘एक प्रभाग-एक उमेदवार’, तर उर्वरित महाराष्ट्रात ‘पॅनेल’ सिस्टीम
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मतदानाची पद्धत. मुंबई महापालिकेत २२७ जागांसाठी प्रत्येकी एक सदस्य निवडला जाणार आहे, त्यामुळे मुंबईकरांना ईव्हीएमवर केवळ एकच बटन दाबायचे आहे. मात्र, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या उर्वरित २८ शहरांत ‘बहुसदस्यीय प्रभाग’ पद्धत असल्याने मतदारांना एकाच वेळी ३ ते ४ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यामुळे या शहरांतील मतदारांना ईव्हीएमवर वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिकांनुसार ४ वेळा बटन दाबावे लागत आहे, जे अनेक मतदारांसाठी नवीन अनुभव ठरत आहे.
मालेगावची आघाडी अन् मुंबईची संथ पण ठाम सुरुवात
सकाळच्या पहिल्या दोन तासांतील आकडेवारीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील मालेगावमध्ये सर्वाधिक ११.०९% मतदानाची नोंद झाली आहे. मुंबईत सुरुवातीला मतदानाचा वेग ६.९८% इतका संथ वाटत असला, तरी १० वाजेनंतर उच्चभ्रू वस्त्यांपासून ते चाळींपर्यंत सर्वत्र रांगा वाढल्या आहेत. अहिल्यानगर (८.१४%) आणि ठाण्यातही (८.००%) मतदारांचा कल समाधानकारक दिसत आहे. दुपारच्या सत्रात हा टक्का २५ ते ३० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ठाकरे बंधूंचे शक्तीप्रदर्शन अन् ‘पाडू’ यंत्रावरून संशयाचे मळभ
मुंबईत तब्बल दोन दशकांनंतर उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने ही लढत ‘हाय-व्होल्टेज’ झाली आहे. मकर संक्रांतीचे औचित्य साधून ठाकरे कुटुंबाने मुंबादेवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, ईव्हीएमला जोडल्या जाणाऱ्या ‘पाडू’ (PADU) नावाच्या नवीन प्रिंटिंग यंत्रावरून राज ठाकरे यांनी घेतलेला आक्षेप आणि काही केंद्रांवर मतदानाची शाई पुसली गेल्याच्या तक्रारींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दिग्गजांची हजेरी आणि सुरक्षेचा कडा पहारा
सकाळपासूनच सरसंघचालक मोहन भागवत, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, अनुप जलोटा आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांसारख्या दिग्गजांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावला. मुंबईत २८,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात असून, संवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. ईव्हीएममधील किरकोळ बिघाड वगळता राज्यात सर्वत्र मतदान शांततेत सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


