Mira Bhayandar Cyber Fraud : ‘केवायसी’च्या नावाखाली फसवणूक केलेली रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवली

Mira Bhayandar Latest Cyber Fraud News : मीरा-भाईंदरमध्ये ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार, गमावलेले 1 लाख 99 हजार रुपये परत
मीरा-भाईंदर,:- ‘केवायसी’ (KYC) अपडेट करण्याच्या बहाण्याने एका महिलेची 1 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक झाली होती. मात्र, सायबर पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कार्यवाहीमुळे आणि पाठपुराव्यामुळे महिलेला तिची गमावलेली संपूर्ण रक्कम परत मिळाली आहे.
नेमका प्रकार काय?
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आचोळे येथील रहिवासी जाधव यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला बँकेचा अधिकारी सांगून त्यांची केवायसी तात्काळ अपडेट न केल्यास बँक खाते बंद होईल, अशी भीती दाखवली. घाबरलेल्या जाधव यांनी त्या व्यक्तीला आपल्या बँक खात्याची आणि इतर वैयक्तिक माहिती दिली. त्यानंतर लगेच त्यांच्या खात्यातून 1 लाख 99 हजार रुपये काढल्याचा मेसेज त्यांना आला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.सायबर पोलिसांची तातडीची कारवाई सायबर पोलिसांनी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन राष्ट्रीय सायबर गुन्हेगारी तक्रार पोर्टल (NCCRP) वर तक्रार नोंदवली. यामुळे फसवणुकीची रक्कम ज्या संशयित खात्यात वर्ग झाली होती, ती गोठवण्यात पोलिसांना यश आले.
त्यानंतर, पोलिसांनी न्यायालयाला या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार, बँकेसोबत पाठपुरावा करून जाधव यांची फसवणूक झालेली 1 लाख 99 हजार रुपयांची रक्कम त्यांच्या मूळ खात्यात परत मिळवून देण्यात आली.
सायबर पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीमुळे नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी सायबर पोलिसांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांच्या टीमने केली.


